मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईत सिल्व्हर ओक या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रामदास आठवले यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनीच एकत्र प्रयत्न करण्याची गरज असल्याबाबत उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. (Union minister Ramdas Athawale meet NCP chief Sharad Pawar)
महाराष्ट्रात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र प्रयत्न झाले पाहिजेत. केंद्र सरकारचे मंत्री म्हणून महाराष्ट्राला अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी रामदास आठवले म्हणाले. शरद पवार यांच्याशी आपले नेहमी आपुलकीचे संबंध राहिले आहेत. एकमेकांच्या सुखदुःखात भेटून एकमेकांना आधार दिला पाहिजे. त्यामुळे आज शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भेट घेतली असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.
– आधी गरिबांना मोफत धान्य दिलं होतं तसा निर्णय राज्य सरकारने आत्ताही घ्यायला हवा.
– महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय, सरकारने काहीतरी करायला हवं.
– तमाशा कलावंतांना महाराष्ट्र सरकारने 5-5 हजार रुपये द्यावेत.
केंद्र सरकार कुठल्याही राज्याला सापत्न वागणूक देत नाही, लसी पुरेशा आहेत. तरीही काही अडचण असल्यास केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रयत्न करू, असे रामदास आठवले यांनी म्हटले.
2 कोटी, 50 कोटी, 100 कोटी हे आकडे पाहता महाराष्ट्र सरकारमध्ये मोठा भष्टाचार असल्याचं दिसतं आहे. अनिल परब म्हणतात यात भाजपचा हात आहे, पण वाझे शिवसेनेत होते. जे काही आरोप केलेत त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. भाजप काही वदवून घेऊ शकत नाही. वाझे शिवसेनेचा माणूस असून सरकारवर आरोप करतो म्हणजे ते सत्य असले पाहिजेत, असे रामदास आठवले यांनी म्हटले.
तसेच अनिल परब यांनी राजीनामा देऊन त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली. पोलिसांकडून दहशतवाद्यांप्रमाणे काम होतंय, यातून हजारो कोटी रुपये कमावण्याचे प्रयत्न आहेत, यामागे कुणाचा हात होता याची योग्य चौकशी व्हायलाच पाहिजे, असेही रामदास आठवले यांनी म्हटले.
(Union minister Ramdas Athawale meet NCP chief Sharad Pawar)