मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) कोठडीत असलेले API सचिन वाझे (Sachin Vaze) यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यांना आता उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. काल रात्रीही सचिन वाझे यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे एनआयएच्या कार्यालयात मध्यरात्री डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते. साधारण एक वाजण्याच्या सुमारास हे डॉक्टर एनआयएच्या कार्यालयातून बाहेर पडले. (Sachin Vaze sachin waze facing health problems)
त्यानंतर सोमवारी दुपारी पुन्हा वाझे यांची प्रकृती खालावल्याचे समजते. एनआयएच्या कार्यालयात उपचार करणे शक्य नसल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात नेण्यात आल्याचे समजते. यापूर्वी शनिवारी रात्रीही सचिन वाझे यांची प्रकृती खालावली होती. एनआयएने त्यांची सलग 13 तास चौकशी केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांना थकवा जाणवायला लागला होता. त्यामुळे सचिन वाझे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात गेले होते. याठिकाणी त्यांना सलाईन लावण्यात आले होते, अशी माहितीही सूत्रांनी दिली होती. त्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी सचिन वाझे यांच्यावर डॉक्टर बोलावून उपचार करण्याची वेळ आली आहे. सचिन वाझे यांच्या चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून NIA कडून त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.
अंबानी स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) हाती लागलेल्या माहितीनंतर अनेक खळबळजनक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकार सावध झाल्याचे दिसत आहे. काहीवेळापूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार साधारण 12 वाजण्याच्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊणतास चर्चा सुरु होती. या भेटीत सचिन वाझे आणि एनआयएचा तपास या दोन विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संबंधित बातम्या:
मोठी बातमी: NIA चे अधिकारी सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार
स्कॉर्पिओ गाडीवर सचिन वाझेंच्या हाताचे ठसे; NIA ने पुरावे दाखवल्यानंतर वाझेंची बोलती बंद
(Sachin Vaze sachin waze facing health problems)