बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. तिथल्या तख्ता पलटनंतर कट्टरतावाद्यांनी अल्पसंख्यांकाना टार्गेट केले आहे. तर दुसरीकडे बांगलादेशी घुसखोरांनी सुद्धा देशात हैदोस घातला आहे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्या प्रकरणातील आरोपी थेट बांगलादेशी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने बांगलादेशींवर कारवाईची मागणी वाढली आहे. त्यांच्या आश्रयदात्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
बांगलादेशातून थेट मुंबईत
सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफउल इस्लाम शेहजाद मो. रोहिल्ला अमीन फकीर आहे. तो बांगलादेशातील झलोकाठी या जिल्ह्यातील राजाबरीया येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. तो 30 वर्षांचा आहे. त्याने भारतात घुसखोरी केली आहे. सुरुवातीला पश्चिम बंगाल आणि नंतर त्याने थेट मुंबई गाठली.
भारतात आल्यानंतर तो ठाण्यात एका हॉटेलमध्ये हाऊसकिपिगचं काम करत होता. त्यानंतर कन्स्ट्रक्शन साईटवरही काही दिवस काम केल्याचे तपासात समोर आले. पाच ते सहा महिन्यांपूर्वी तो मुंबईत आला होता. हा अनेक महिन्यांपासून बेरोजगार होता. चोरीच्या उद्देशाने तो सैफच्या घरात शिरला मात्र ते सैफअली खानचं घर होतं हे त्याला माहित नव्हतं, असे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
तपास यंत्रणा लागल्या कामाला
आरोपीला भारतात वास्तव्यास असताना कोणी मदत केली याची आता चौकशी होणार आहे. हाउसकिपिंग एजन्सीत त्याला काम कसे मिळाले हेसुद्धा मुंबई पोलीस तपासणार आहेत. बांगलादेशी नागरिकांना भारतात वास्तव्यास मदत करणारे अनेक एजंट असतात या प्रकरणात आरोपीला कोणी मदत केली याची चौकशी होणार आहे. हाऊसकिपिंग एजन्सीत काम करताना आवश्यक असणारी भारतीय कागदपत्रे आरोपीकडे होती का आणि नसतील तर त्याला काम कसे मिळाले याची चौकशी होणार आहे.
3 वर्षांत 928 बांगलादेशींना अटक
मोहम्मद शरीफउल इस्लाम शेहजाद मो. रोहिल्ला अमीन फकीर याला पोलिसांनी ठाण्यातून मध्यरात्री ताब्यात घेतले. तर यामुळे बांगलादेशींचे देशातील वास्तव्य पुन्हा रडारवर आले आहे. अमरावती, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, मालेगाव, नाशिक, बुलडाणा, कोकण आणि मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट आहे. पण त्यांना शोधणारी सक्षम यंत्रणा नसल्याने त्यांचे फावते आहे. तर अनेक ठिकाणी चिरीमिरी देऊन त्यांना भारतीय ओळखपत्र तयार करण्यासाठी मदत होत असल्याचे पण समोर आले आहे. मुंबईत गेल्या 3 वर्षांत 928 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. हा आकडा अत्यंत नगण्य असल्याचे सांगण्यात येते. घुसखोरांची संख्या यापेक्षा मोठी असल्याचे समोर येत आहे.
घुसखोरीसाठी मोठे सिंडिकेट
देशातील विविध भागात बांगलादेशी घुसखोरांना रोजगार मिळवून देण्यासाठी रॅकेट असल्याचे समोर आले आहे. शहरानुसार बांगलादेशी नागरिकांकडून रक्कम वसूल करण्यात येते. भारतीय आणि बांगलादेशातील एंजट यांचे मोठे सिंडिकेट त्यासाठी काम करते. बांगलादेशातच त्यांच्याकडून पैसे घेण्यात येतात. त्यानंतर बेकायदेशीररित्या भारतात त्यांचा प्रवेश होतो. त्यातील काहींना तर बांगलादेशातच भारतीय आधार कार्ड, पॅनकार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. तर ज्यांच्याकडे मोठी रक्कम नाही. त्यांना केवळ बेकायदेशीर प्रवेश देण्यात येतो. येथे काम करून नंतर ते रहिवाशी दाखला मिळवत असल्याची माहिती समोर येत आहे. या कामासाठी 20 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागत असल्याचा दावा करण्यात येतो.