मुंबईः गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह आदरणीय व्यक्तींबद्दल भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहेत. त्यामुळे आता राज्यातील वेगवेगळ्या संघटना आक्रमक झाल्या आहेत. आजही शिंदे गटाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून शिवाजी महाराज यांची तुलना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर केली आहे. त्यामुळे संभाजी ब्रिग्रेड ही संघटना आक्रमक झाली आहे.
मंत्री लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी मिंधे गटाच्या शिंदेसोबत शिवाजी महाराजांची तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा अवमान असल्याचे म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, ‘याद राखा, शिवाजी महाराजांची तुलना फितुरांसोबत करणार असाल तर ही गोष्ट अत्यंत निंदनीय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना करताच संभाजी ब्रिगेडने भाजपलाही इशारा दिला आहे.
भाजपला इशारा देताना त्यांनी म्हटले आहे की, ‘इथून पुढे भापज, आरएसएस किंवा कोणीही शिवाजी महाराजांचा अपमान करेल तर गुद्द्या म्हणजे बुक्क्याशिवाय पर्याय राहणार नाही’ असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी कधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तर कधी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.
राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याबरोबर केली होती.
त्यामुळे हा वाद ताजा असतानाच पुन्हा शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने हा वाद पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे आहेत.