मुंबई: मराठा समाजाच्या सात मागण्यांसाठी खासदार संभाजी छत्रपती संभाजी छत्रपती उपोषणाला बसले होते. तीन दिवस त्यांचे उपोषण चालले. यावेळी त्यांच्या पत्नी संयोगिता राजे यांनीही अन्नाच्या कणाला हात लावला नव्हता. पतीच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि त्यांचे उपोषण लवकर सुटावे म्हणून त्यांनी आराध्य दैवत सिद्धिविनायकाला नवस केला होता. विशेष म्हणजे तब्बल 13 वर्षानंतर त्यांनी पहिल्यांदाच हा नवस केला होता. त्यांचा हा नवस पूर्ण झाल्याने नवस फेडण्यासाठी संभाजी छत्रपती आणि संयोगिता राजे आज सिद्धिविनायकाला आले होते. ओबेरॉय हॉटेलपासून ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत खासदार संभाजी छत्रपती आणि संयोगिता राजे पायी चालत सिद्धिविनायकाला आले होते. यावेळी त्यांनी मंदिरात जाऊन पूजा अर्चा करून नवस फेडला. यावेळी संभाजी छत्रपती यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
छत्रपती संभाजी राजे आणि संयोगिता राजे आज सकाळीच ओबेरॉय हॉटेलमधून निघाले. त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारीही होते. पायी चालतच ते सिद्धिविनायक मंदिरात आले. यावेळी अनेकांशी त्यांनी मध्येमध्ये थांबून संवादही साधला. त्यानंतर मंदिरात जाऊन संयोगिता राजे आणि संभाजीराजेंनी सिद्धिविनायकाची मनोभावे पूजा केली. तसेच संयोगिता राजे यांनी नवसही फेडला.
छत्रपती संभाजी महाराज 2009 साली जेव्हा ते पराभूत झाले तेव्हा पासून मी नवस मागणं सोडून दिलं होतं. पण गेल्या 3 दिवसांपासून ते उपोषण करत होते. त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी मी सिद्धिविनायकाकडे साकडं घातलं होतं. मुंबईचं आराध्यदैवत सिद्धिविनायक आहे असं ऐकलं होतं. तेव्हा मी बाप्पांना नवस बोले आणि तो पूर्ण झाला. माझी साथ देण्यासाठी राजे माझ्या सोबत इथे आले, असं संयोगिता राजे यांनी सांगितलं.
मी नेहमी फीट राहणारा व्यक्ती आहे, आमच्या पत्नी संयोगिता राजे यांनी माझ्या उपोष्णा संदर्भात सिद्धिविनायकाकडे नवस मागितला होता. त्यांना साथ देण्यासाठी मी आज त्यांच्यासोबत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आलो, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.
समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, असं संभाजी राजे यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणावरही भाष्य केलं. माझी भूमिका आधीही न्यायाची होती. सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये बसून तोडगा काढला पाहिजे हे माझं मत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या: