मुंबई: वर्षावर उद्या या आणि शिवबंधन बांधा असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी काल स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati ) यांना दिला होता. त्यामुळे शिवसेना संभाजी छत्रपती यांना राज्यसभेचे अपक्ष (Rajyasabha Eleciton) उमेदवार म्हणून पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती यांची कोंडी झाली आहे. मात्र, शिवसेनेत प्रवेश न करण्याच्या भूमिकेवर संभाजी छत्रपती ठाम असून त्यांनी मुख्यमंत्र्यांची ऑफर धुडकावल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार आता संभाजीराजेंच्यासाठी सरसावले असल्याचं चित्रं आहे. संभाजीराजेंना राज्यसभा नाकारणं हे राजकीय दृष्ट्या परवडणारं नाही, असं या आमदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेने संभाजी छत्रपती यांना शिवसेनेच प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. आज दुपारी 12 वाजता त्यांना वर्षावर येऊन शिवबंधन बांधण्याचा निरोपही देण्यात आला आहे. मात्र, संभाजी छत्रपती हे आज दुपारी वर्षावर जाणार नसल्याचं सांगण्यात येतं. शिवसेनेत प्रवेश करण्याऐवजी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करण्याची विनंती संभाजी छत्रपती यांनी केली होती, असं सूत्रांनी सांगितलं. मात्र, त्यांची ती मागणीही मान्य झाली नसल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे संभाजी छत्रपती यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. त्यातून संभाजी छत्रपती मार्ग कसा काढतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संभाजी छत्रपती यांना शिवसेनेने पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे. तर संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे पाठिंब्याचा तिढा सुटताना दिसत नाही. मराठा संघटनांनीही शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचे आमदारही संभाजी छत्रपतींच्या पाठिशी उभे राहताना दिसत आहेत. संभाजी छत्रपतींना पाठिंबा नाकारणं राजकीय दृष्ट्या परवडणारं नाही, असं शिवसेना आमदारांनी पक्षश्रेष्ठींना कळवल्याचं सांगितलं जात आहे.
निर्माण झालेल्या राजकीय कोंडीच्या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपतींकडे आता तीनच पर्याय आहेत. एक म्हणजे शिवसेनेत प्रवेश करू राज्यसभा निवडणूक लढवणे, दुसरा पर्याय म्हणजे कुणाचाही पाठिंबा मिळत नसताना अपक्ष म्हणून निवडणूक लढवणे आणि तिसरा म्हणजे निवडणुकीतून माघार घेणे. यातील कोणता पर्याय संभाजीराजे निवडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संभाजीराजे यांनी अपक्ष लढण्याचा पर्याय निवडला तर त्याचं शिवसेनेलाच नुकसान होणार आहे. अपक्ष लढून पराभव झाला तर मतदान न करणारे पक्ष एक्सपोज होतील. त्यामुळे मराठा समाजात या राजकीय पक्षांविरोधात रोष निर्माण होऊन जो पक्ष मतदान करणार नाही, त्याला त्याची किंमत मोजावी लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.