मुंबई : पन्हाळगडाकडे (Panhala fort) दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासन आणि नगरपालिकेबाबत शिवप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आपण यामध्ये तातडीने लक्ष घालून प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. यासंबंधी त्यांनी एक पत्रच मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या (Historical) सर्वात महत्त्वाच्या अशा तीन राजधानीच्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या आणि करवीर छत्रपतींची राजधानी म्हणून ओळखला जाणारा किल्ले पन्हाळगड अखेरची घटका मोजत आहे. पावसामुळे किल्ल्याची तटबंदी आणि बुरूज ढासळले असून अनेक ठिकाणी भेगाही पडत आहेत, असे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी आपल्या पत्राल उल्लेखले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या काही वर्षांपासून महापुराचा सामना करावा लागतोय. या संततधार पावसामुळे पन्हाळा किल्ल्याचे अस्तित्वसुद्धा धोक्यात आले असून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले ग्रामस्थही इथे दिवस रात्र भीतीच्या छायेत जगत आहेत. बुरूज आणि तटबंदी कोसळल्यामुळे पायथ्याशी असलेल्या गावात मोठमोठे दगड आणि पाण्याचे लोट येत आहेत. दुर्दैवाने काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण, प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे, असे चित्र दिसते, असे पत्रात नमूद केले आहे.
पुढे ते लिहितात, की अशातच पन्हाळ्याला केंद्रीय पुरात्तव खात्याचा पूर्ण वेळ प्रभारी अधिकारी नसल्याने राज्य शासनाची ही जबाबदारी ठरते. वेळीच किल्ल्याची डागडुजी आणि संवर्धन केले नाही तर हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती ताराराणी यांच्या पराक्रमाचा वारसा लाभलेला ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पन्हाळगडाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासन आणि नगरपालिकेबाबत शिवप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आपण यामध्ये तातडीने लक्ष घालून प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.