मुंबई: मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करून पूरपरिस्थितीची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री किती मिनिटांचा दौरा करतात हे पाहावं लागेल, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. शेतकऱ्यांना सरकार मदत करेल ही अपेक्षा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यासाठीच सरकारला पत्र लिहिलं होतं. कोकणात अद्यापही मदत मिळालेली नाहीये. तुटपुंजी मदत जाहीर केली. पण तीही पूरग्रस्तांच्या हातात पडली नाही. आता त्वरीत शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर करावी, अशी मागणी देशपांडे यांनी केली.
पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी जे उपया करणे गरजेचे आहे. ते करायला हवे, असं सांगतानाच मुख्यमंत्री आता किती मिनिटांचा दौरा करतात ते पाहावं लागेल. त्यांना कितपत काय समजेल याबाबत शंका वाटते, असा टोलाही त्यांनी लगावला. खड्ड्यांबाबत जनतेत असंतोष आहे. रेल्वे बंद, वाहतूक कोंडी, 15 मिनिटांच्या प्रवासाला दीड तास लागतोय. सरकारने कोर्टात खोटे प्रतिज्ञापत्रं दिलं आहे. सरकार खोटं बोलत आहे, असं सांगतानाच येत्या दोन तीन महिन्यात निवडणुका होत आहेत. त्यावेळी जनताच त्यांच्या न्यायालयात त्यांचा न्याय करेल, असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनाही टोला लगावला. सुप्रिया सुळे यांनी सेल्फी विथ पॉटहोल्स ही मोहीम राबवली होती. या मोहिमेची त्यांना आठवण करून द्यायला हवी. निदान त्यांच्या भीतीने तरी खड्डे बुजवले जातील, असा टोला त्यांनी हाणला.
शाळा सुरू करण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी मनसेची भूमिका मांडली. शाळेमुळे मुले स्ट्रिक्ट होतात. स्मार्ट होतात. त्या वातावरणात मुलं अभ्यास करतात. आता मुलांची वाढ खुंटली आहे. शाळा सुरू होत नसल्याने मुलांची घुसमट होत आहे, असं ते म्हणाले.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गायब आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हे षडयंत्र आहे का माहीत नाही. पण एका शहराचा आयुक्त पळून जातो. माजी गृहमंत्री गायब होतो. जर काही केलं नाही तर घाबरत का आहेत? असा सवाल करतानाच इथेच पाप केलं तर इथेच पापं भोगावी लागतील, असंही ते म्हणाले.
ताई काही जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?? pic.twitter.com/nwkjr6dX0d
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 30, 2021
संबंधित बातम्या:
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे गोव्यात प्रचाराला येणार, डिपॉझिट जप्त का व्हायचं?; राऊतांनी सांगितलं कारण
राज ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार द्या, अजित पवार म्हणतात, जरुर, पण एकच अट !
(sandeep deshpande taunt cm uddhav thackeray’s marathwada visit)