मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा (Sanjay Gandhi National Park) चेहरा मोहरा बदलून या ठिकाणी केवळ मुंबई किंवा राज्यातूनच नव्हे तर देशविदेशातून वन पर्यटकांचा ओघ सुरू झाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) तातडीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विकास आराखडा तयार करावा असे निर्देश वन विभागाला (Forest Department) दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जगातील विविध उद्यानामधील पर्यटकांना आकर्षित करणारे पशु-पक्षी आणण्यासाठी प्रयत्न करावे. या उद्यानात पर्यटकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. मुंबईच्या नागरिकांना जगातील उत्कृष्ट उद्यानाचा आनंद घेता येईल असे उपक्रम याठिकाणी निर्माण करण्यात यावेत अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.
विविध जातींच्या सापांचे संग्रहालय तयार करून त्यांची सविस्तर माहिती देण्यात यावी. काळा बिबट्या, पांढरा सिंह, असे आपल्याकडे दुर्मिळ असणारे प्राणी तसेच पक्षी या उद्यानात आणावेत तसेच वाघांची, बिबट्याच्या सफारीचे उपक्रम राबविण्यात यावे. होलोग्राफिक प्रोजेक्शन असे उपक्रम या उद्यानात राबविण्यात यावेत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रदूषण मुक्त करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहने आणावीत. चिल्ड्रन पार्क, बोटिंग, अद्ययावत शौचालयाची सुविधा याठिकाणी करण्यात यावेत अशा सुचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
यावेळी वन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानक्षेत्र विकास, संचालक मल्लिकार्जुन, नागपूरहून दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) वाय एल पी राव आदींची उपस्थिती होती.
संबंधित बातम्या
Nalasopara: ऑफिसात घुसला साप, कॅबिनेमध्ये साप पाहून एकच थरकाप! पाहा CCTV Video
Jalgaon Accident : जळगावमध्ये मुंबई-नागपूर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात