औरंगजेबाची कबर ही राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आली. त्यानंतर नागपूरमधील हिंसाचार उफाळला. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. या सर्व घडामोडींचा समाचार खासदार संजय राऊत यांनी सामानाच्या रोखठोकमधून घेतला आहे. त्यांनी याप्रकरणात भाजपवर निशाणा साधतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी नागपूरची कोणी निवड केली असा सवाल विचारला आहे. ज्यांना औरंगजेबाचे थडगे पाडायचे आहे, त्यांना दख्खनमधील ताजमहालही उखडायचा आहे का? असा रोकडा सवाल त्यांनी केला. औरंगजेबाच्या नावाने राज्यात राजकारण होणे हे योग्य नाही, अशी टीका राऊतांनी केली.
थडग्यातील औरंगजेब जिवंत केला
संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये, थडग्यातील औरंगजेब जिवंत केला या शीर्षकाखाली भाजपवर निशाणा साधला. औरंगजेबाच्या नावावरून नागपूरची युद्धभूमी केली का असा प्रश्न त्यांनी केला. त्यांनी गृहखात्यावर सुद्धा टीका केली. औरंगजेबाच्या इतिहासाचा धांडोळा घेत या रोखठोकमधून भाजपाच्या धोरणावर त्यांनी टीका केली. नवहिंदुत्ववाद्यांना देशात अराजक माजवायचे असल्याचा आरोप त्यांनी केला.
अडवणींवरून भाजपावर निशाणा
औरंगजेब हा क्रूर होताच. त्याने त्याचा बाप, भाऊ यांना तुरूंगात डांबले अथवा खतम केले. ब्रिटिश शासनकर्ते सुद्धा क्रूरच होते. मोगलांच्या खुणा आपण नष्ट करत आहोत, पण ब्रिटिशांच्या खुणा जतन करून ठेवल्या आहेत. लालकृष्ण अडवाणी यांची स्थिती पाहिल्यावर अनेकांना कैद झालेल्या शहाजहानची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अशी टीका सामन्यातून करण्यात आली.
तैमूर नावावरून साधला निशाणा
तुजुक ए तैमुरी या तैमूर याच्या आत्मकथेवरून त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर निशाणा साधला. भारतात आपण पर्यटनासाठी आलो नाही तर काफिरांना मारण्यासाठी, त्यांची संपत्ती लुटण्यासाठी आल्याचे तैमूरने सांगितले आहे. तरीही देशातील एका प्रख्यात सिने कुटुंबाने त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवले आणि पंतप्रधानांनी त्याचे कौतुक केले, असा टोला रोखठोकमधून लगावण्यात आला. तर बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगजेबाची कबर खोदण्यास सांगितले नाही तर औरंगबादाचे नाव बदलून टाकले, याची आठवण त्यांनी करून दिली.