मुंबई : उद्या 20 जून म्हणजे जागतिक गद्दार दिन आहे. हा दिवस जगभर साजरा करण्यासाठी आम्ही युनोला पत्र देणार आहोत. उद्याचा दिवस गद्दार दिन साजरा करण्याची मागणी युनोकडे केली जाणार आहे. शिवसेना आणि महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने ही मागणी करणार आहे. 20 जून हा सर्व जगातील गद्दारांसाठींचा दिवस राहील. यूनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल, असं सांगतानाच आमचं सरकार आल्यावर आम्ही दरवर्षी 20 जून रोजी गद्दार दिवस साजरा करू. या दिवशी या 40 गद्दारांचं रावणासारखं दहन करू, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले. तसेच 19 जून हा निष्ठा डे. हा निष्ठावंतांचा दिवस आहे, असंही राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.
गेल्या अनेक वर्षात शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न झाला. पण प्रत्येकवेळी शिवसेना नव्या जोमाने उभी राहिली आणि आकाशाला गवसणी घातली. मुंबई-ठाण्याच्यापुढे शिवसेना जाणार नाही असं त्याकाळात म्हटलं जात होतं. पण शिवसेनेने दिल्लीपर्यंत धडक मारली. राष्ट्राच्या अनेक प्रश्नात शिवसेनेचं योगदान राहिलं आहे. शिवसेना महाराष्ट्र आणि दिल्लीत सत्तेत आली. ते फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. नरेंद्र मोदी आणि शहांमुळे नाही, असं संजय राऊत म्हणाले.
शिंदे गट आमचे मोदी, आमचे शाह म्हणत आहे. असं कधी शिवसेनेने म्हटलं नाही. आमचे बाळासाहेब ठाकरे. बाकी इतर सगळे. मिंधे गट फक्त आमचे फडणवीस, आमचे मोदी, आमचे शाह म्हणत आहे. आम्हीही म्हणायचो आमचे वाजपेयी, आमचे आडवणी. तो एक स्वतंत्र काळ होता. पण या सर्वांमुळे शिवसेना नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि लाखो शिवसैनिकांमुळे आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आमची शिवसेना मर्द मावळ्यांची भगवदगीता आहे. ती राहील. आम्ही भगवदगीतांच्या पानापानांचा अभ्यास आणि विचारांचं अखंड प्राशन करून इथपर्यंत पोहोचलोय. बाळासाहेबांनी अस्मितेचा विचार दिला. जहाल विचार दिला. त्यांनी लढण्याची प्रेरणा दिली. त्यांचा विचार मरत नसतो. चोरला जात नसतो. त्याकाळात अनेक चोर निर्माण झाले. बाळासाहेबांनी त्यांना ढेकणासारखं चिरडून टाकलं. आता जे दिसत आहेत, त्यांचंही तेच होणार आहे, असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा बरोबर बोलत आहे. अजित पवार महाराष्ट्रातील बिग बी आहेत. महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक आहेत ते. काल शिवसेनेचा मेळावा होता. त्यात जो विचार मांडायला हवा तसा तो मांडला. काल मी स्पष्ट सांगितलं. उद्धव ठाकरेंसमोर बोललो. महाविकास आघाडी फक्त काय ते शिंदे मिंध्यांकडेच फेव्हिकॉलचा जोड असतो असं नाही. महाविकास आघाडीकडेही आहे फेव्हिकॉलचा जोड आहे, असं त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंची इच्छा आहे 25 वर्ष महाविकास आघाडी टिकावी. मी तेच म्हटलं उद्धव ठाकरे यांची इच्छा असेपर्यंत टिकावी. म्हणजे 25 वर्ष महाविकास आघाडी टिकणार आहे. शरद पवार आणि काँग्रेसचीही तीच इच्छा आहे. त्यात चुकलं काय? भाजप आणि त्यांच्या गद्दार गटाला मातीत गाडावं ही आमची इच्छा आहे. आम्ही तसंच करणार आहोत. अजितदादांना शंका असण्याचं कारण नाही. आपण सर्व एक आहोत, एकत्र राहू आणि लढू, असं ही ते म्हणाले.