संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा किल्ला लढवला. त्यापूर्वी पण त्यांची तोफ धडाडत होती. लोकसभा निकालानंतर नरेंद्र मोदी यांच्या सरकार केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेत आले आहे. राऊतांच्या शब्दांना अजून धार आली आहे. त्यांनी आता एक खळबळजनक दावा केला आहे. सत्तेत वाटेकरी असलेल्या या तीन पक्षांचा केव्हा पण गेम होऊ शकतो असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. तर मोदी हे औटघटकेचे पंतप्रधान ठरतील हे भाकितही त्यांनी केले आहे.
उपाध्यक्ष पद विरोधी पक्षाला द्या
भारतीय जनता पक्षाचा पराभव केला. यांच्या झुंडशाहीचा, हुकूमशाहीचा संविधान विरोधी कृतीचा पराभव केलाय. त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षपद हे पारदर्शक पद्धतीने निवड होणे गरजेचे आहे. उपाध्यक्ष पद हे आता कायद्याने, घटनेने आता विरोधी पक्षाला मिळायला हवं, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
ते तर औटघटकेचे पंतप्रधान
आता नरेंद्र मोदींचा काय ताम जाम राहिलाय .मला सांगा टेकू वर बसले टेकू कधी घसरू शकतो. माझ्या माहितीनुसार, भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत नाही तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत त्यांना नेता निवडण्यात आले आहे. मोदींनीच त्यांच्या नेत्यांना सांगून स्वतःची निवड करुन घेतली, असा टोला राऊतांनी लगावला. या देशातील जनतेने मोदींना नाकारले आहे. त्यामुळेच लोकसभेचा अध्यक्ष विहित पद्धतीने निवडून येणे आवश्यक आहे. मोदी हे आता औटघटकेचे पंतप्रधान आहेत. राहुल गांधी यांनी सांगितलं तर आम्ही कोणत्या क्षणी सरकार पाडू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा अध्यक्ष पदाची आतुरता
लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार, याची आतुरता कायम आहे. त्याच्याविषयी कमालीची गोपनियता आहे. 24 जून रोजी 18 व्या लोकसभेचे पहिले सत्र सुरु होत आहे. 26 जून रोजी लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होईल. मग अध्यक्ष तेलगू देसमचा होणार की भाजपचा? रणनीती सुरु झाली आहे. लोकसभा अध्यक्ष पदासाठी ही मोठी लढाई आहे. संसदेत आता 2014 आणि 2019 सारखी स्थिती थोडीच आहे, असे संकेत देत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला.
मोदींचा गेम प्लॅन; या तीन पक्षांना धोका
त्याचवेळी त्यांनी भाजप आणि मोदींवर कडक प्रहार केला. भारतीय जनता पक्षाचे परंपरा आहे ज्याचे खावे मीठ त्याची XXX नीट ही भाजपची परंपरा आहे. आज त्यांच्या टेकूवर हे सरकार उभं आहे. लोकसभा अध्यक्षपदी एनडीएची व्यक्ती नसेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे सर्वात अगोदर तेलगू देसम पक्ष फोडतील. ते काम त्यांनी सुरु केले आहे. ते नितीश कुमार यांचा जनता दल (संयुक्त), जयंत चौधरी यांचा पक्ष आणि चिराग पासवान यांचा पक्ष फोडतील, असा खळबळजनक दावा राऊतांनी केला.