मुंबई : संभाजीनगरच्या किराडपुरा भागात काल रात्री तुफान राडा झाला. दोन गटात झालेल्या हाणामारी आणि जाळपोळीत प्रचंड नुकसान झालं आहे. जमावाने पोलिसांच्या गाड्याही पेटवून दिल्या. त्यामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळापासून या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. संभाजी नगरातील राडा संपला असला तरी आता राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर संभाजीनगरच्या दंगलीमागे डुप्लिकेट शिवसेना असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राऊत यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर मायुसी का? असा सवाल राऊत यांनी केला.
औरंगाबादेत तणावर निर्माण केला जात आहे. या मागे कोण आहे हे गृहमंत्र्यांना कळायला हवं. हे शिवसेना करत नाहीये. हे डुप्लिकेट शिवसेना करत आहे. या सरकारचा हेतू आहे राज्यात अशांतता निर्माण व्हावी असाच आहे. दंगली व्हाव्यात असा या सरकारचा हेतू आहे. गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न आहे, असं सांगतानाच संभाजीनगरला जे झालं, ते सरकारचं अपयश आहे. राज्यात अस्थिरता निर्माण व्हावी, तणाव कायम राहावा म्हणून मिंधे गट काम करतोय, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
सध्या जे फडणवीस दिसत आहेत ते पूर्वीसारखे फडणवीस नाहीत. फडणवीस निराश झाले आहेत. वैफल्यग्रस्त होऊन काम करत आहेत. त्यामागची कारणं शोधावी लागतील. जाहीर सांगता येणार नाही. त्यांच्या चेहऱ्यावर मायुसी का आहे? असा सवाल राऊत यांनी केला.
राज्यातील मंत्री मंत्रालयात भेटत नाहीत. बाहेर सरकारचं अस्तित्व नाही. म्हणून तर कोर्टाला या सरकारला नपुंसक आणि अस्तित्वहीन सरकार म्हणावं लागलं आहे. या सरकारचा जीव खोके आणि पेट्यात आहे. ज्या सरकारचा जीव खोक्यात आणि पेट्यात असतो त्याला नपुसंक म्हणतात. कोर्टाने बरोबर तोच मुद्दा उचलाल. सत्यमेव जयते यालाच म्हणतात, असा चिमटा त्यांनी काढला आहे.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सभेवरही भाष्य केलं. राज्यात महाविकास आघाडीच्या सभा दणक्यात होतील. मराठवाड्यातील सभा प्रचंड मोठी होईल. पुढची सभा पाचोऱ्यात होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
अयोध्येतील राम मंदिरासाठी चंद्रपुरातील सागवान लाकूड नेण्यात येणार आहे. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचं योगदान अयोध्येच्या लढ्यात आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान म्हणजे महाराष्ट्राचं योगदान आहे. तुम्ही लाकूड नेता चांगलं आहे. हातोडे मारण्याचं काम आम्हीच केलंस असंही त्यांनी सांगितलं.