लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. तर मोठ्या यशाने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. आगामी विधानसभा खिशात घालण्यासाठी महाविकास आघाडीने आतापासून नियोजन सुरु केले आहे. मागील काही चुका टाळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातच आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटाला डिवचण्यास सुरुवात केली आहे. संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा डिवचले आहे.
राऊतांची तुफान फटकेबाजी
शिवसेनाचा स्थापना दिन दोन्ही गटांनी साजरा केला. त्यावरुन दोघांनी एकमेकांवर टीकस्त्र सोडले आहे. शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पुजण्याचा अधिकार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि निवडणुक आयोग यांच्या देवघरात तसबीर ठेवून त्याची पुजा करण्याचा चिमटा पण त्यांनी शिंदे गटाला काढला.
हिंमत असेल तर चोरलेले धनुष्य बाण चिन्ह, पक्ष तुम्ही परत करा, मग निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान त्यांनी शिंदे गटाला दिले. त्या चिन्हाच्या आणि पक्षाच्या जोरावर त्यांना काही जागा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जर शिवसेनेचे चिन्ह असते तर लोकसभेत उद्धव ठाकरे गटाला 22 जागा मिळाल्या असत्या, असे ते म्हणाले.
चोरलेले चिन्ह, पक्षावर निवडून येणं म्हणजे ठासून येणं होत नाही. जनतेने त्यांना लोकसभेत चांगला धडा शिकविल्याचे राऊत म्हणाले. आता विधानसभेत पण महायुतीची वाताहत होणार आहे. जनता त्यांना जागा दाखवून देणार असल्याचे राऊत म्हणाले. सध्या भीतीमुळेच त्यांनी विधानसभेची आताच तयारी सुरु केल्याचे चिमटा त्यांनी काढला.
हिंमत असेल तर…
मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असले तर त्यांनी स्वतंत्र पक्ष काढावा. स्वतंत्र चिन्ह घ्यावं आणि विधानसभेच्या निवडणुकीत उतरावं असे आव्हान त्यांनी दिले. यावेळी त्यांनी नारायण राणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आठवण काढली. या दोघांनी शिवसेना पक्ष अथवा चिन्ह चोरले नसल्याचे त्यांनी सूचित केले. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्वतःच्या स्वतंत्र पक्षावर ताकद दाखविण्याचे आवाहन राऊतांनी यावेळी केले.