सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक बांधण्यात आलं. 4 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. पण उद्धाटनानंतर आठ महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा कोसळला. काल झालेल्या या घटनेनंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे सरकारवर हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. त्यामुळे अख्खा महाराष्ट्र दु:खात आहे. पण शिंदे सरकारच्या चेहऱ्यावर वेदनेची लकेर नाही. ज्यांचे छत्रपती शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत. ते लाडकी बहीणच्या गोष्टी करतात, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. समुद्रावर वारा असल्याने पुतळा कोसळला, असं सरकार म्हणतंय. हे हास्यास्पद आहे. समुद्रावर वारा नाहीतर काय असणार? पुतळा बांधताना त्याची काळजी घ्यायला पाहिजे की नको?, असा सवाल राऊतांनी विचारला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. मुघलांनीही महाराष्ट्रावर अनेकदा आक्रमनं केली. पण शिवरायांचा असा अपमान मुघलांनीही केला नव्हता. तो अपमान काल अवघ्या देशाने पाहिला. आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानाने सुटून बाहेर आले. पण काल आपल्याच महाराष्ट्रात कोसळून पडण्याची वेळ त्यांच्यावर आली. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे जबाबदार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना काम दिलं. या प्रकल्पाचे ठेकेदार, शिल्पकार सगळे ठाण्यातले आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्र दु:खी आहे. त्याची भरपाई कधीच कुणी करू शकणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा. सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राऊतांनी केली.