मुंबई : कोण्या एका आमदाराने म्हटले आहे, की काय झाडी हाय, काय डोंगार हाय, काय हाटील हाय, मग महाराष्ट्रात काय स्मशान आहे का, असा सवाल करत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना फटकारले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार आसाममधील हॉटेल रेडिसन ब्लू (Radisson Blu Hotel Guwahati) याठिकाणी आहेत. त्या हॉटेल आणि परिसराचे वर्णन आमदारांनी करत काय झाडी हाय, काय डोंगार हाय, काय हाटील हाय असे म्हटले होते. सोशल मीडियावर आता हे ट्रेंड होतानाही दिसत आहे. त्यावर संजय राऊत संतापले. त्यांनी आता या बंडखोर आमदारांना (Shiv Sena’s rebel MLA) फटकारले आहे. ज्या हॉटेलमध्ये हे बंडखोर आमदार थांबले आहेत, आम्हालाही रेडिसन ब्लू हॉटेलला मेल करून कार्यक्रमासाठी 40 खोल्या मागितल्या, पण अजून मेल नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना डिवचले.
शिवसेनेच्या बंडखोरांबरोबर चर्चा करण्यासाठी आम्हाला रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये किमान वीस खोल्या द्या. मी याठिकाणी अनेकवेळा गेलो आहे. खूप चांगले हॉटेल आहे. कोण्या आमदाराने म्हटले देखील आहे, काय हॉटेल आहे, काय झाडी आहे, काय पाणी आहे, मग महाराष्ट्रात काय स्मशान आहे का, असा समाचार त्यांनी या बंडखोरांचा घेतला. तर आम्हाला खोल्या द्या, आम्ही याविषयी मेलदेखील केला. मात्र अद्याप काहीही उत्तर आले नाही, असा टोला त्यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
ज्यांना यायचे आहे, त्यांचे स्वागतच आहे. कारण अनेकांना जबरदस्तीने नेण्यात आले आहे. त्यामुळे ते मनाने आमचेच आहेत. त्यांनी यावे, उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी, असे संजय राऊत म्हणाले. तर तिथे बसून बोलून काहीही साध्य होणार नाही. इथे येवून चर्चा करावीच लागेल. बंडखोर आमदारांविषयी शिवसैनिकांत चीड आहे. ते केवळ पक्षप्रमुखांच्या आदेशाची वाट पाहत आहे. मात्र आम्ही संयम बाळगून आहोत, असे ते म्हणाले. बंडखोरांमध्येही बंडखोरी होऊ शकते, असेही संजय राऊत बंडखोरांना म्हणाले आहेत.