मुंबई : अर्थमंत्री फडणवीसांनी बजेट मांडलं आणि अजित पवारांपाठोपाठ राऊतांनीही सरकार पडणार असा दावा केलाय. विशेष म्हणजे त्यांनी 14 मार्च ही तारीख सांगितलीय. 14 तारखेला नेमकं काय होणार आहे. पाहुयात
अजित दादाही म्हणतात सरकार कोसळणार आणि संजय राऊतही म्हणतायत की सरकार कोसळणार. बजेटमध्ये अर्थमंत्री फडणवीसांनी मोठमोठ्या घोषणा केल्या. या घोषणांवरच अजित पवार आणि राऊतांना शंका आहे. 14 मार्चला सरकार कोसळणार, हे माहिती असल्यानंच बजेटमधून घोषणाबाजी झाल्याचं, अजित पवार आणि संजय राऊत म्हणतायत.
सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टातल्या घटनापीठासमोर 14 मार्चला सुनावणी आहे. ठाकरे गटाचा युक्तिवादानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे वकील युक्तिवाद सुरु केलाय. 14 मार्चला मंगळवारी शिवसेनेकडून अॅड. हरीश साळवे युक्तिवाद करतील 14 तारखेपासून किमान 3 दिवस युक्तिवादाची शक्यता आहे. त्यानंतर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात घटनापीठ निकाल देण्याची शक्यता आहे.
अर्थात अपात्रतेसंदर्भातला निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांकडेच येण्याची शक्यता आहे. आता हे प्रकरण सध्याचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे येईल की उपाध्यक्ष नरहरी झिरवळांकडे हे घटनापीठच निर्णय घेईल.
राऊतांनी आपला मोर्चा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडेही वळवला. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासूनच भाजपची अधोगती सुरु झाल्याची टीका राऊतांनी केलीय. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही ठाकरेंच्या शपथविधीपासूनच सरकार कोसळणार असे दावे, भाजपचे नेते करत होते..सरकार कोसळलं पण त्यासाठी अडीच वर्षे लागली. आता असेच दावे महाविकास आघाडीचे नेते करतायत.