नवी दिल्लीः शरद पवारांशिवाय (Sharad Pawar) मोदींविरोधात (Modi) पर्याय निर्माण होऊ शकत नाही, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. ते नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले की, शरद पवार साहेब हे खूप मोठे नेते आहेत. आम्ही सगळेच त्यांचा आदर करतो, सन्मान करतो. देशातल्या विरोधी पक्षाला एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. देशातील विरोधी पक्ष एकत्र यावेत, समविचारी पक्ष एकत्र यावेत यासाठी नक्कीच काही भूमिका ठरतायत, काही हालचाली ठरतायत. आणि शरद पवार यांच्या सक्रिय सहभागाशिवाय या एकजुटीचे पाऊल पुढे जाणार नाही, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पवार साहेबांचे मार्गदर्शन याबाबतीत नेहमी लाभत असते. त्यांच्या मनात काय आहे, हे आम्ही समजून घेऊ. शरद पवारांशिवाय मोदींना पर्याय किंवा विरोधी पक्षाची एकजूट होऊ शकत नाही, हे माझे स्पष्ट मत आहे. देशामध्ये अनेक प्रमुख नेते आहेत. जे सक्षम आहेत. त्या एकजुटीचे नेतृत्व करण्यासाठी. मात्र, या आघाडीचे नेतृत्व करण्यात शरद पवारांनी पुढे यावे, असे आम्हाला वाटते.
शिवसेना मेरीटमध्ये आली…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसची ढ टीम असल्याचे म्हटले होते. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, कोणती कोणाची टीम हा त्यांचा प्रश्न आहे. काय बोलायचे काय नाही ते. तोंडाच्या कोणत्या वाफा दवडायच्या ते. पण महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना मिरीटमध्ये आलेली आहे, म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. ज्या राज्याचे नेतृत्व शिवसेना करते, शिवसेनेचा मुख्यमंत्री करतो, याचा अर्थ शिवसेनेला राजकारण उत्तम कळते.
मुख्यमंत्री टॉप लिस्टमध्ये…
संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेमध्ये निर्णय घेण्याची उत्तम क्षमता आहे. आणि शिवसेनेला, मुख्यमंत्र्यांना राज्यातल्या लोकांचा पाठिंबा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सतत तीन वेळा देशातल्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या टॉप लिस्टमध्ये आलेले आहेत. हे जर कुणाला कळत नसेल, तर त्यांचा नंबर राजकारणात ढ पेक्षाही खाली मानावा लागेल. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकांच्या दृष्टीने शिवसेना ही मेरीट लिस्टमध्ये आलेली आहे. आता कोणाला काय बोलायचा हा त्यांचा प्रश्न.