मुंबई : पहिल्या वेळेला मला धमकी आली होती. त्याची मी माहिती गृहमंत्र्यांना दिली होती. तेव्हा त्यांनी चेष्ट केली. गृहमंत्री विरोधकांना आलेली धमकी गांभीर्याने घेत नसेल आणि चेष्टा करत असेल तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? पण हा सर्व प्रकार गृहमंत्र्यांना महाग पडल्याशिवाय राहणार नाही. त्यावर उपाय काही नाही. सरकार घालवणं हाच उपयोग आहे. विरोधकांचा आवाज दबला जात नाही. काटा काढण्याचा हा प्रकार आहे. हा सरकार स्पॉन्सर्ड टेररिझम आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गृहखात्याला सुनावले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी कडक शब्दात सरकारला सुनावले आहे. विरोधकांना निनावी धमक्या येत आहेत. त्यांचं नियंत्रण नसेल तर ठिक आहे. नाही तर आम्ही परिस्थितीला सामोरे जाऊ. आम्ही आमच्या पद्धतीने संघर्ष करू. संजय राऊतांना धमक्या आज आल्या नाहीत. आतापर्यंत मी चार वेळा फडणवीस यांना धमक्यांची माहिती दिली. पुराव्यासह माहिती दिली.
कोण कुठे माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचत आहे, याची माहिती दिली. गुंडाच्या टोळ्या वापरून संजय राऊत यांच्यावर हल्ला करण्याच्या योजना आखल्या जात आहेत. हे स्वत: मी पुराव्यासह कळवलं. पण त्याच गुंडाला संरक्षण दिल्याची माझी माहिती आहे. ज्याला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे, त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे फोटो आहे. ही त्यांची कायदा सुव्यवस्था. आम्ही काय म्हणून सरकारकडे दाद मागायची? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
मागच्या काळात मला धमकी आली होती. त्यावेळी पुण्यातून पोलिसांनी एकाला अटक केली. आता नवीन प्रकरण सुरू झालं. तुम्हाला कळवणं हे आमचं कर्तव्य आहे. सुरक्षा किंवा पोलीसबिलिस मागत नाही. हे पोलीस वगैरे आहेत ते मिंधे गटाच्या संरक्षणाला पुरत नाहीत. आम्हाला कुठे देणार? आम्ही संरक्षण मागणार नाही. आज पवारांना धमकी आली. या राज्यात काय चाललंय? विरोधकांनी आपली भूमिका मांडायची नाही. मांडली तर त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यायची नाही ही राज्याची संस्कृती कधीच नव्हती. सुनील राऊत यांनी मला आलेल्या धमकीबाबत गृहखात्याला कळवलं आहे. त्यांच्याकडे धमकावणाऱ्याचा फोन आला होता. मी फोन उचलला नाही. दोघात चांगली चकमक झाली आहे, असं त्यांनी म्हटलं.
दाभोळकर करू असं म्हणण्याची वृत्ती ही सध्याच्या राज्यकर्त्यांची आहे. त्यांचा वचक नाही. ते अशा गोष्टींना उत्तेजन देत आहेत. शरद पवारांना औरंगजेब म्हणण्यापर्यंत मजल जाते. उद्धव ठाकरे यांचा उल्लेख असभ्य भाषेत केला जातो. किमान सभ्यता राज्यकर्त्यांना पाळता येत नसेल तर हे माफीया वळवळणारच. गृहमंत्री उत्तेजन देत आहेत या प्रवृत्तीला, मुख्यमंत्र्यांचा तर प्रश्नच येत नाही. पण गृहमंत्रालय या प्रवृत्तीला उत्तेजन देत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
धमकावणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कारवाई होणार असेल तर चांगली गोष्ट आहे. पण कधी करणार कारवाई? कारवाईत काय करणार? तुमच्या पक्षाची लोकं हातात तलवार आणि बंदूका घेण्याची भाषा करत आहेत, काय कारवाई केली तुम्ही? तुमच्या पक्षाची लोक अप्रत्यक्षपणे दंगली घडवत आहेत, काय कारवाई केली? तुमच्या पक्षाची लोक राजकीय विरोधकांना ठार मारण्यासाठी उत्तेजन देतात, काय कारवाई केली तुम्ही? मुंबईत राज्यात महिलांना ठार केलं जातं , काय कारवाई केली तुम्ही सांगा ना? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
मी कधीच तक्रार करत नाही. फक्त कळवत असतो. हे निर्ढावलेले लोक आहेत. ते स्वत:च माफियांना आपल्या राजकीय विरोधकांच्या सुपाऱ्या देतील. या धमक्या सरकार पुरस्कृत आहेत. तसं नसतं तर धमक्या आल्या नसत्या. आमच्या फडणवीस यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी गृहमंत्र्यांना भेटत नाही. मला सुरक्षेची गरज नाही. हा सरकार स्पॉन्सर्ड टेररिझम आहे, असा आरोपही त्यांनी केला.