मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या; संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप

| Updated on: Sep 24, 2024 | 10:42 AM

Sanjay Raut on Akshay Shinde Encounter : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. त्यांनी बदलापूरमधील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचीही मागणी केली आहे. संजय राऊत काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या; संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप
संजय राऊत, खासदार
Follow us on

बदलापूरमधील दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलं. त्यानंतर बदलापूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा काल एन्काऊंटर झाला. त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारला काही प्रश्न विचारलेत. तसंच गंभीर आरोपदेखील केले आहेत. मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांचे सरकारवर आरोप

अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर, कालचा प्रकार संशयास्पद आहे. कालची हत्या किंवा इन्काँटर कोणाला वाचवण्यासाठी झाला? टॉयलेट साफ करणारा पोरगा कधीपासुन बंदुक चालवू लागला? या प्रकरणात पोलिसांना, सरकारला आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपटे यांना वाचवायचा आहे. त्यासाठी त्यांनी मुख्य पुरावा नष्ठ केला आहे. बदलापूरच्या लोकांची मागणी होती. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, फाशी द्या… मंत्र्याला पिटाळून लावले, आधिका-यांना येऊ दिले नाही. तेव्हा फडणवीस म्हणाले कायदा हातात घेऊ नका म्हणून सांगत होते. अक्षय शिंदेचा खटला फास्ट ट्रकवर चालवणार सांगत होते. मग आता हा एन्काऊंटर झाला कसा? मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली, असं राऊतांनी म्हटलं आहे.

शेकडो आंदोलकांवर तुम्ही गुन्हे लावलेत ते मागे घ्या…पोस्को ज्यांच्यावर लावलाय तुम्ही त्यांना अटक केलाय. शाळेची संस्था भाजप संबंधित लोकांची आहे. त्यांना वाचवत आहेत. शिंदे, फडणवीस संस्था चालकांना वाचवत आहेत. शाळेतील CCTV का काढलं? त्यासाठी कालचे कथानक रचलं होतं का? मुख्यमंत्री आधी एक बोलतात मग एक बोलतात. बैठक घेऊन ठरवा की काय खोटे बोलायचे आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर

बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. त्यानंतर बदलापूरमध्ये मोठं आंदोलन उभं राहिलं. रेल्वे रूळांवर उतरून नागरिकांनी रेलरोको केला. जवळपास 11 तास हे आंदोलन चाललं. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले त्यानंतर आता काल या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. अक्षयने पोलिसी बंदूक घेऊन पोलिसांवर हल्ला केल्याने स्वसंरक्षणासाठी त्याचा एन्काऊंटर केल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावर आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.