महाराष्ट्र जागाच आहे. महाराष्ट्र कधीच झोपलेला नाही. म्हणूनच तर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने तुम्हाला झोपवलं ना… जो पर्यंत महाराष्ट्र जागा आहे. तोपर्यंत या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा इतर सगळे लुटारू… तुम्हाला हा देश इंग्रजांप्रमाणे लुटता येणार नाही. आम्ही महाराष्ट्रात जागे आहोत. आम्ही जागे नसतो महाराष्ट्राचा अर्धा सातबारा देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने गौतम अदानींच्या नावावर केला असता, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटवर राऊतांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे.
यही समय है, सही समय है। सोए हुओं को जगाने का…, असं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत फडणवीस काय बोलणार? याकडे लक्ष लागलेलं आहे. असं असतानाच फडणवीसांच्या ट्विटवर संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. भाजपच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही, देवेंद्र फडणवीस म्हणतात हे धर्मयुद्ध आहे. पण महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचं धर्मयुद्ध सुरु आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
यही समय है, सही समय है।
सोए हुओं को जगाने का…उद्या सकाळी 10.30 वा.#MaharashtraElection2024 pic.twitter.com/BGzNDLlaB6
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 15, 2024
मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्कवर विधानसभा निवडणुकीची सांगता सभा व्हावी, यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने महापालिकेकडे अर्ज केला. प्रशासनाने राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली. त्यामुळे ठाकरे गटाने बीकेसी मैदानावर सभा घ्यायचं ठरवलं. मात्र प्रकृती ठीक नसल्याने राज ठाकरे यांची सभा रद्द झाली आहे. यावर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. आम्हाला शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली नाही. 12 तास आधी या लोकांनी परवानगी दिली. बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे. वाद नकोत. त्यामुळे आम्ही बीकेसी मैदानावर सभा घ्यायचं ठरवलं. आमची प्रचाराची सांगता सभा, सगळ्यात मोठी सभा होतेय. 17 नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजता उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीकेसीलाच होणार आहे. शिवतीर्थवर आमची सभा होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
ज्यांना तिथं शिवाजी पार्कवर सभा घ्यायची आहे. त्यांना ती घेऊ द्या. मला कुणीतरी सांगितलं की मनसे प्रमुखांची प्रकृती बिघडल्यामुळे ते सभा घेणार नाहीत. त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा, अशी देवाकडे प्रार्थना करतो, असं संजय राऊत म्हणालेत.