महाविकास आघाडीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?; काँग्रेसमधील बड्या नेत्याचं नाव घेत म्हणाले….

| Updated on: Nov 21, 2024 | 12:34 PM

Sanjay Raut on Mahavikas Aghadi Maharashtra CM : महाविकास आघाडीचा सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीच्या किती जागा येणार? यावर संजय राऊत यांनी काय म्हटलं? वाचा सविस्तर...

महाविकास आघाडीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?; काँग्रेसमधील बड्या नेत्याचं नाव घेत म्हणाले....
संजय राऊत, राहुल गांधी
Image Credit source: ANI
Follow us on

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. काल मतदान प्रक्रिया पार पडली. शनिवारी 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मतदानानंतर आज आणि उद्या असे दोन दिवस आहेत. त्यामुळे सरकार कुणाचं होणार? सत्तेत कोण असणार? राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेऊ, असं महाविकास आघाडी आणि महायुतीने जाहीर केलं आहे. मात्र आज सकाळी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे नेते, संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. संजय राऊत यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्याचं यावेळी नाव घेतलं.

मुख्यमंत्रिपदाबाबत राऊत काय म्हणाले?

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यास कोण राज्याचा मुख्यमंत्री होणार? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं. तेव्हा निकालाच्या दिवशी 23 तारखेला 10. 30 ते 11.00 वाजता मी सांगेल महाविकास आघाडीचा कोण मुख्यमंत्री असेल ते…, असं संजय राऊत म्हणाले. तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. याबाबत विचारलं असता. नाना पटोले यांना मुख्यमंत्री बनवायचा असेल तर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणालेत.

महाविकास आघाडीच्या किती जागा येणार?

महाविकास आघाडी 26 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकते. मविआला १६०-१६५ जागा एकत्रित निवडून येत आहेत. त्यामुळे एक्झिट पोल वरती कोणीही विश्वास ठेवू नये. आम्ही २३ तारखेला ही सत्तेवर दावा करू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

काल मतदान झाल्यानंतर काल संध्याकाळी विविध एजन्सीचे एक्झिट पोल आले आहेत. यातील काही पोलमध्ये महायुती आघाडीवर दाखवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीकडे कल असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलीय. एक्झिट पोल हा एक फ्रॉड आहे. हरियाणामध्ये काँग्रेस ६० च्या वर जागा येईल पण काय झाले आपण पाहिले. लोकसभेला ४०० पार पण काय झाले आपण पाहिलं. लोकांनी मतदान केले ते गुप्त असतं. काही लोक गोंधळ वाढवन्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणत राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.