लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. सहा टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता सातव्या टप्प्यातील मतदान होईल. त्यानंतर निकाल लागेल. या निकालाआधी संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. देशात इंडिया आघाडीची सत्ता येणार आहे. 4 जूनच्या दुपारनंतर देशात राज्यघटनेला उभारी मिळेल, असं संजय राऊत म्हणालेत. इंडिया आघाडीकडे बहुमत असेल, असंही संजय राऊत म्हणालेत. सामनाच्या ‘रोखठोक’ सदरातून संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच नितीन गडकरींच्या पराभवासाठी देवेंद्र फडणवीस यांनी रसद पुरवल्याचा दावाही राऊतांनी केली आहे.
निवडणुका जवळ जवळ संपल्या आहेत आणि चार जूननंतर काय? यावर चर्चा सुरू आहेत. मोदी व शहा यांचा पराभव झाला तरी ते सहज सत्ता सोडणार नाहीत. एखाद्या हुकूमशहाप्रमाणे ते सत्ता सोडण्यास नकार देतील असे बोलले जाते ते खरे नाही. 4 जूनच्या दुपारनंतर देशात राज्यघटनेला उभारी मिळेल, लष्करप्रमुख, पोलीस, प्रशासन यांचे प्रमुख मोदी-शहांचे काहीएक ऐकणार नाहीत. या सर्व संस्था गुलामीच्या बेड्या तोडून टाकतील. “ये लोक कब जा रहे है?” अशीच भावना यापैकी प्रत्येक जण खासगीत व्यक्त करत होता.
ट्रम्प यांनी पराभव स्वीकारला नाही व अमेरिकेच्या संसदेत त्यांचे भाडोत्री लोक घुसवून गोंधळ घातला. असा काही प्रकार मोदी-शहांचे लोक करतील काय? असे काहीच करण्याचे बळ त्यांच्याकडे राहणार नाही. या दोघांनाही पराभव स्वीकारावा लागेल. कारण कोणताही अतिरेकी प्रयोग केल्यास शांत डोक्याने क्रांती करणारा मतदार खवळून रस्त्यावर येईल.
ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीसप्रमुख दरम्यानच्या काळात राहुल गांधी यांच्या दारात भेटीसाठी उभे राहिल्याचे चित्र दिसेल. त्यामुळे विरोधकांना धमकावण्याची ताकद त्यांच्यात राहणार नाही. सत्तांतर शांतपणे व सुरळीत पार पडेल. मोदी व शहांमध्ये लढण्याचे बळ व कौशल्य नाही व तपास यंत्रणांचे हत्यारच नसल्याने या दोघांनाही कदाचित काही काळासाठी अज्ञातवासातच जावे लागेल, नाहीतर लोकांचा रोष सहन करावा लागेल.
भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष मिळून बहुमताच्या आसपास पोहोचत नाहीत व इंडिया आघाडीस तीनशेच्या जवळपास जागा मिळत आहेत. मोदींचे सरकार जात आहे. त्यामुळे परदेशी उद्योगपतींनी साधारण सवा लाख कोटींची गुंतवणूक मागे घेतली. नव्या सरकारबरोबर नवा करार करू असे या सगळ्धांचे म्हणणे. मोदी यांच्या काळात नवी गुंतवणूक देशात आलीच नाही व देशाची संपत्ती घेऊन येथील धनिक बाहेर गेले. भारतातून सर्वाधिक संपत्ती दुबईत गेली. दुबईच्या रिअल इस्टेट उद्योगात सर्वाधिक गुंतवणूक भारतीयांनी केली आहे. २९,७०० भारतीयांनी मोदी काळात दुबईत संपत्ती खरेदी केली.