मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भेटीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवारांना भेटायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात असतील तर चुकीचं काय? राज्यात काही समस्या असेल आणि त्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे शरद पवार यांना भेटायला गेले असतील तर चुकीचं काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
मीडियाने सत्य समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढला तर अशा पद्धतीने कुणी कुणाकडे जायला नको. विधीमंडळात अनेक आमदार एकमेकांना भेटत असतात. त्यामुळे खळबळ माजते का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एखादा नेता मुख्यमंत्र्यांना भेटला तर चुकीचं काय? आम्ही राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना निवेदन देत असतो. त्यांना भेटत असतो. त्यात चुकीचं काय? काही काळ का होईना मुख्यमंत्री सत्तेवर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना डिसमिस केलं. तरीही ते खुर्चीत आहेत. जोपर्यंत खुर्चीत आहेत तोपर्यंत त्यांच्याकडे निवेदनं दिली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकसभा आणि विधानसभेचं जागा वाटप सुरळीतपणे पार पडेल. कुणाला चिंता वाटण्याचं कारण नाही. आनंदाच्या उकाळ्या फुटण्याचं कारण नाही. प्रत्येक जागेचा ऊहापोह केला जाईल. कोण जिंकू शकतं. एकमेकांना कशी मदत करायची त्यावर चर्चा होईल. त्यानंतर विधानसभेचं जागा वाटपही त्याच पद्धतीने होईल. आमच्यात कोणतेही मतभेद होणार नाही. वज्रमूठ कायम राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. त्याचंही त्यांनी स्वागत केलं. आपण शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य चालवतो. शिवाजी महाराज विश्वाचं दैवत आहे. शिवाजी महाराजाची जगात वाहवा केली जाते. त्यांचं युद्ध कौशल्य, प्रशासन, मानवतावाद, निधर्मीपणा याला मान्यता मिळाली आहे. त्यांचा राज्याभिषेक सोहळा अत्यंत देखणा करणं राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे, असं राऊत म्हणाले.
शिवाजी महाराजांच्या संदर्भात जेवढा अभ्यास करावा तेवढा कमी आहे. त्यांच्या राज्यात सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना समान स्थान होते. महाराजांचे अंगरक्षक मुसलमान होते. तोफखाना सांभाळणारा मुस्लिम होता. शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांनी जनतेला न्याय दिला. हीच शिवशाही आहे. शिवाजी महाराजांची हिंदुराष्ट्राची संकल्पना वेगळी होती. त्यांनी कधी हेट स्पीच दिलं नव्हते. ते निधर्मी राजे होते. सर्वांना सोबत घेऊन विश्वास देऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, असा टोला त्यांनी भाजप आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना लगावला.
येत्या 18 तारखेला शिवसेनेची बैठक नाही. वरळीचं सभागृह आहे. तिथे शिवसेनेचं महाअधिवेशन होणार आहे. दिवसभर हे अधिवेशन असणार आहे. राज्यातून नव्हे देशातून पदाधिकारी येतील. दहा हजार पदाधिकारी या महा अधिवेशनाला उपस्थित राहतील. त्यामुळे त्याला बैठक हे स्वरुप नाही, असं त्यांनी सांगितलं.