मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यानी महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचं विधान केलं आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावर चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी हे विधान करून ठाकरे गट आणि काँग्रेसला सूचक संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी त्यावर मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वांचे डीएनए टेस्ट करावे लागतील, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
आम्ही एकदा सर्वांचे डीएनए टेस्ट करू. हा विनोद समजून घ्या. शिवसेना-भाजप युतीतही मोठा-लहान भाऊ हा विषय आला होता. तेव्हाही मी डीएनए टेस्ट करावी लागेल असं म्हटलं होतं. कोण लहान? कोण मोठं? महाविकास आघाडीत असे मतभेद नाहीत. अजितदादा काय म्हणतात, मी काय म्हणतो यापेक्षा प्रत्येकजण पक्षाची भूमिका मांडत असतो. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी असं बोललं जातं. लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. विधानसभेला अजून वेळ आहे, असं संजय राऊत म्हणाले.
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. त्यांनी महाराष्ट्राचा अपराध केला आहे. हा अपराध किती मोठा आहे हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. तरीही त्यांना मुख्यमंत्री भेटत असतील तर ती त्यांची प्रवृत्ती आहे. घटनाबाह्य काम करून कोश्यारींनी एक राज्य आणलं. आपण आणलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना भेटायला राज्यपाल गेले असतील तर ते दोन घटनबाह्य व्यक्ती पाहून घेतील. आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही, असं ते म्हणाले.
कोश्यारी यांनी शिवसेना तोडण्यासाठी घटनेचा गैरवापर केला. हे या देशानं पाहिलं. उद्धव ठाकरे यांना पदावरून घालवण्यासाठी त्यांनी कायद्याचा गैरवापर केला हे सर्वोच्च न्यायालायने सांगितलं. अशा व्यक्तीला मुख्यमंत्री मिठी मारत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरही टीका केली. नोट बंदी फसली. पहिली आणि दुसरी सुद्धा फसली. 2 हजाराच्या नोटा तुम्हीच आणल्या ना. 1 हजार आणि 500च्या नोटा होत्या ना. किती भ्रष्टाचार कमी झाला? दहशतवाद कमी होईल. बनावट नोटा चलनातून बाद होईल असं मोदी म्हणाले होते. यातील काय झालं? सर्व वाढलं. मोदी देशाशी खोटं बोललं आहेत. मोदींच्या निर्णयामुळे साडेतीनशे लोक रांगेत मेली. हा सदोष मनुष्यवध आहे. भाजप प्रायश्चित घेणार का? मला फासावर लटकवा म्हणायचे. फासाचा दोर पाठवायचा का तुम्हाला. अहमदाबाद, सुरतचे दुकान चालवत आहात का? हे काही कपड्याचं दुकान आहे का? देश चालवत आहात ना? असा सवाल त्यांनी केला.