मुंबई : आमच्या मित्रांना भांग पाजवली गेली, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भांग कुणी पाजली? त्यांनीच का? असा सवाल करतानाच महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आलंय? ती भांग उतरली की सत्ता जाईल, असं संजय राऊत म्हणाले. आम्ही पूर्णपणे शुद्धीत आहोत. राज्यातील जनताही शुद्धीत आहे, हे कसब्याच्या निकालाने स्पष्ट झालं. भागं पिऊन जे सत्तेत बसले आहेत. त्यांना कळेल महाराष्ट्र आणि राज्यातील जनता काय आहे. त्यांची सर्व भांग कसब्यात उतरली आहे, असा जोरदार हल्लाबोलही राऊत यांनी केला.
संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. हक्कभंगाच्या नोटीशीवरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही एक प्रक्रिया असते विधिमंडळाची. त्या संदर्भात. मला नोटीस मिळाली. तेव्हा मी मुंबईत नव्हतो. काल परवा आलो. नंतर अधिवेशनाला सुट्ट्या होत्या. आमच्या नेत्यांशी चर्चा करणार. अंबादास दानवे, भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि इतर नेत्यांशी चर्चा करू. त्यानंतर काय प्रक्रिया आहे ते पाहून त्यावर उत्तर देऊ. मी विधिमंडळाचा अपमान होईल असं विधान केलं नाही. एका गटापुरतं मी बोललो. त्या गटाला मी चोरमंडळ म्हणालो. ते योग्य आहे. संपूर्ण महाराष्ट्र म्हणतो. संपूर्ण सभागृहाबाबत असं विधान करणं योग्य नाही, असं राऊत म्हणाले.
राज्यातील जनता भांग पिऊन काही काम करत नाही. तसं असतं तर कसब्याचा निक्काल लागला नसता. आम्ही विरोधी पक्ष आणि जनता चांगल्या मनाने काम करत आहोत. त्यामुळे पुढील काळात त्यांची भांग उतरल्याशिवाय राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
लालूप्रसाद यादव यांच्या घरावर सीबीआयच्या धाडी पडल्या. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या देशातील आणि राज्यातील परिस्थिती तशीच आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवला तर गुन्हेगार ठरवलं जातं. लोकांना घाबरवलं जात आहे. या देशात चुकीला चूक म्हणणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातं. त्यांच्या विरोधात चौकशी लावली जाते. नऊ नेत्यांनी पंतप्रधानंना पत्र पाठवलं आहे.
विरोधक भांग प्यायले असे श्रीमान देवेंद्र फडणवीस म्हणतात… हा सुध्दा नशेचा अतिरेकी आहे.
बांधावर पिकं आडवी झाली… शेतकऱ्यांच्या आयुष्याची धूळधाण झाली आणि सरकार धुळवडीच्या रंगात नाहून निघालं…
ही सत्तेची चढलेली भांग नाहीतर काय? pic.twitter.com/C4n31vYqtw— Sanjay Raut (@rautsanjay61) March 8, 2023
त्यानंतर लगेच लालूंच्या घरी धाड पडली. सिसोदियांना अटक झाली. मग गौतम अडानीला नोटीस तरी पाठवली का? ज्याने मोदी शाह यांच्या मदतीने अख्खा देश लुटला. त्याला साधी नोटीस तरी पाठवली का? तुम्ही धाडी कुणावर टाकताय विरोधी पक्षावर? जे असत्य आहे. त्याविरोधात आम्ही लढणार. आम्ही घाबरणार नाही. शिवसेनेचं नाव आणि चिन्हं बेकायदेशीरपणे काढून घेतलं. तरीही शिवसैनिक लढत आहेत, असंही ते म्हणाले.
दरम्यान, राऊत यांनी फडणवीस यांचा एक धुळवडीचा एक फोटो ट्विट करून जोरदार टीका केली आहे. विरोधक भांग प्यायले असे श्रीमान देवेंद्र फडणवीस म्हणतात… हा सुध्दा नशेचा अतिरेक आहे. बांधावर पिकं आडवी झाली… शेतकऱ्यांच्या आयुष्याची धूळधाण झाली आणि सरकार धुळवडीच्या रंगात नाहून निघालं…ही सत्तेची चढलेली भांग नाहीतर काय?, असा सवाल राऊत यांनी केला आहे.