मुंबई : उद्धव ठाकरे यांना बारसूत येऊ देणार नाही. असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला होता. राणे यांच्या या इशाऱ्याची ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. येऊ देणार नाही म्हणजे काय? म्हणजे काय? तुमच्या या पोकळ धमक्या बंद करा, असं सांगतानाच उद्धव ठाकरे हे कोणत्याही क्षणी बारसूत उतरतील. त्यांना रोखून तर दाखवाच, असं प्रती आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
उद्धव ठाकरे बारसूत सभा घेणारच नव्हते. सभा उद्या महाडला होती. पण बारसूत अत्याचार सुरू आहेत. त्यामुळे ते बारसूला आले आहेत. लोकांशी चर्चा करणार आहेत. येऊ देणार नाही म्हणजे काय? अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांना गृहमंत्र्यांनी अटक केली पाहिजे. ठाकरे कुटुंब आणि कोकणचं नातं आहे. शिवसेना आणि कोकणचं नातं आहे. जेव्हा जेव्हा कोकणावर आघात झाला. तेव्हा शिवसेना धावून गेली. शिवसेना भांडवलदारांची दलाल नाही. पुन्हा रिपीट करतो. शिवसेना भांडवलदारांची दलाल नाही, असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेना शेतकऱ्यांच्या सोबत आहे. भांडवलदारांचे दलाल धमक्या देत आहेत. आता उद्धव ठाकरे बारसूत उतरतील. काय येऊ देणार नाही? या पोकळ धमक्या देणं बंद करा. या देशात लोकशाही आहे. राज्यात लोकशाही आहे. आंदोलक जमिनी वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. कुणाच्या जमिनी हिसकावून घेत नाहीत. माझी जमीन वाचवण्याचा मला अधिकार आहे. जमीन माझी आहे. आम्ही चोर नाही. दहशतवादी नाही. दहशतवाद्यांसारखी वागणूक देऊ नका. आम्ही आमच्या जमिनी वाचवू. त्यासाठी आंदोलन करू, असा इशाराच राऊत यांनी दिला. शिवसेनेला रोखणारा अजून कोणी जन्माला आला नाही. आम्हाला कोणी रोखू शकत नाही ते उद्धव ठाकरे यांना कोण रोखणार. इथे बसून बाता काय मारता. रोखून तर दाखवा, असं आव्हानच त्यांनी दिलं.
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं. शरद पवारांच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याला शक्तीप्रदर्शन म्हणणं मला योग्य वाटत नाही. तो एक स्वतंत्र पक्ष आहे. एक फार मोठी पिढी पवारांसोबत काम करत आहे. पवारांच्या या निर्णयाने त्यांना धक्का बसणे स्वाभाविक आहे. राजीनामा देणं हा त्यांचा भावनिक निर्णय होता. त्यांनी निर्णय मागे घेतला त्याचा आनंद आहे. पवारांचं नेतृत्व असलं पाहिजे. काल मी त्यांना भेटून सांगितलं. पवारांनी राजीनामा मागे घेतला हे देशाच्या राजकारणासाठी योग्य झालं, असं त्यांनी सांगितलं.