मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा कोठडीतील दिनक्रम टीव्ही 9च्या हाती आला आहे. संजय राऊत सध्या कथित पत्राचाळ घोटाळाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail) ते सध्या आहेत. त्यांना कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आलेली नाही, मात्र इतर काही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्या सर्वसाधारणपणे नियमानुसार मिळतात. त्यात वही-पेन त्यांना पुरवण्यात आले आहे. त्या माध्यमातून ते लिखाण करू शकतात. हे लिखाण जेलच्या बाहेर येणार नाही, याची काळजी जेल प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. ते बातम्या पाहतात. त्याचप्रमाणे लिखाण आणि वाचन सातत्याने करत असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय कैदी (Prisoner) नंबरदेखील त्यांना देण्यात आला आहे. इतर कैद्यांप्रमाणेच त्यांचाही दिनक्रम ठरवून देण्यात आला आहे.
संजय राऊत यांचा कैदी क्रमांक 8959 आहे. घरच्या जेवणाची आणि औषधांची परवानगी देण्यात आली आहे. इतर कैद्यांप्रमाणेच त्यांना ट्रीटमेंट देण्यात येत असली तरीदेखील आपला बराचसा वेळ संजय राऊत वाचन, लिखाणामध्ये घालवत आहेत. शिवाय बातम्याही ते पाहत असल्याची माहिती मिळाली आहे. अलिकडेच संजय राऊत तुरुंगातून सामनासाठी लेखन करत असल्याचा आक्षेप काही राजकीय विरोधकांकडून संजय राऊत यांच्यावर घेण्यात आला होता. मात्र संजय राऊत करत असलेले लिखाण जेलबाहेर येणार नसल्याची काळजी तुरुंग प्रशासनाकडून घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
संजय राऊत सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 22 ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 31 जुलै रोजी ईडीचे एक पथक संजय राऊत यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले होते. कथित पत्राचाळ प्रकरणात ईडीने त्यांची चौकशी केली. चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. आधी 4 ऑगस्टपर्यंत नंतर 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी तर नंतर 22 ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ जमिनीप्रकरणी घोटाळा झाल्याच्या प्रकरणामध्ये राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केलेली आहे.