मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या भावनिक पत्रावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. क्रांती रेडकर यांचा या प्रकरणाशी संबंधच काय? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं.
क्रांती रेडकरांचा काय संबंध आहे? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे. क्रांती रेडकर यांच्यावर कुणी व्यक्तिगत टीका टिप्पणी केलीय असं माझ्या पाहण्यात नाही. ईडी, सीबीआय, एनसीबी हे बाहेरचे अधिकारी महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत. ते मराठीच आहेत ना, ते काय अमराठी आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा सवाल केला.
दिल्लीतून केंद्रीय तपास यंत्रणांचं ज्या प्रकारे आक्रमण सुरू आहे, कारण नसताना अनेकांच्या मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न होत आहे. अनेक खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. धाडी पडत आहे. कालही देगलूरमध्ये निवडणूक सुरू असताना धाडी पडल्या. अशोक चव्हाण मराठी नाहीत का? अजित पवारांचे नातेवाईक मराठी नाहीत का? इथे सर्वच मराठी आहेत. प्रश्न सत्य आणि असत्याच्या लढाईचा आहे. खरं आणि खोट्याची लढाई आहे. पाहू आता काय होते ते, असं त्यांनी सांगितलं.
क्रांती रेडकर यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. ती मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना तीच आहे. बाळासाहेबांच्या विचारांची आहे. सरकार हे ठाकरे सरकार आहे. शरद पवार आहेत. सर्व व्यवस्थित आहे. इथे कुणावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी समीर वानखेडेंबाबत बोलण्यास नकार दिला. गुन्हा महाराष्ट्रात घडलाय. त्याविषयी मी फार बोलणार नाही. कारण तो सरकारचा विषय आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पती समीर वानखेडे यांच्यावर आरोप होऊ लागल्यानतंर क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्रं लिहिलं होतं. आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं.. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजारणाचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्या पर्यंत पोहोचलेलं आहे.. आज ते नाही पण तुम्ही आहात.. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो.. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हीं कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याचि मला खात्री आहे.. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय.. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती, असं क्रांतीने पत्रात म्हटलं होतं.
सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत.. मी एक कलाकार आहे.. राजनीती मला कळत नाही.. आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही.. आमचा काहीही संबंध नसताना रोज़ सकाळी आमच्या अब्रूची लख्तरं चार चौघात उधळली जातात.. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या प्रतिष्ठेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे… अशी खदखदही तिने व्यक्त केली होती.
संबंधित बातम्या:
VIDEO: राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना?; देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिक यांना टोला
(sanjay raut reply to kranti redkar over her letter to cm uddhav thackeray)