मुंबई: मला मुख्यमंत्री कधी करायचं हे राज्यातील जनता ठरवेल, असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी केलं होतं. सुप्रिया सुळे यांच्या या विधानाला राऊत यांनी उत्तर दिलं आहे. सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) हे पुढील 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील हेच सुप्रिया सुळे यांचंही म्हणणं आहे, असं सांगतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात काही लोक संभ्रम निर्माण करत असतात. त्याकडे दुर्लक्ष करा. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. या आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे उद्धव ठाकरेंवर खुश आहेत. त्यामुळे ज्या लोकांनी प्रश्न निर्माण केला. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी सांगितलं. संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं.
संजय राऊत यांनी राज्यसभेच्या निवडणुकीवरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. राज्यसभेसाठी सहा जागा आहेत. त्यांनी सातवा उमेदवार दिला आहे. त्यांना या राज्यांमध्ये घोडेबाजार करायचा आहे असं दिसत आहे. खरं तर त्यांच्या कडे एवढी मत नाहीत. मते असतील तर त्यांनी संभाजी छत्रपती यांना नक्कीच उमेदवारी दिली असती. त्यांनी आधी छत्रपती संभाजी राजांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. त्यांना सहाव्या जागेसाठी उतरवण्याचा प्रयत्न केला आणि मग नंतर त्यांना वार्यावर सोडलं, अशी टीका राऊत यांनी केली.
भाजपने आता कोल्हापुरातून एका दूध आणि साखर सम्राटला उमेदवारी दिली आहे. आश्चर्य म्हणजे भाजपाचे दोन्ही उमेदवार महाराष्ट्राचे नसून ते बाहेरचे आहेत. जे भारतीय जनता पार्टीची निष्ठावान आहेत, जे संघ परिवाराशी संबंधित आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे काम केले आहे, त्यांना डावलण्यात आल्याचा मी वाचले. इतर पक्षातून आले आहेत आणि जे फक्त शिवसेना व महाविकास आघाडीवर चिखलफेक करत असतात अशा लोकांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातच फार नाराजी आहे असं माझ्या वाचनात आणि पाहण्यात येत आहे. भारतीय पक्ष आता जुना राहिलेला नाही. अशाच बाहेरचा लोकांनी येऊन हा पक्ष ताब्यात घेतला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
येत्या 8 जून रोजी औरंगाबादमध्ये शिवसेनेची रेकॉर्डब्रेक सभा होणार आहे. उद्धव ठाकरे औरंगाबादला जाणार आहेत. या सभेतून मराठवाड्यातील वातावरण संपूर्णपणे ढवळून निघेल, असा दावा त्यांनी केला. तसेच ज्ञानवापी प्रकरण कोर्टात असल्याने त्यावर भाष्य करता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.