तुमचाही शशिकांत वारिसे करू, संजय राऊत यांना धमक्यांचे फोन; राजकीय वर्तुळात खळबळ

| Updated on: Feb 11, 2023 | 10:53 AM

रिफायनरी येणार त्या भागात कवडीमोल भावात कुणी जमिनी घेतल्या? कोकणातल्या या सर्व जमीनदारांची यादी जाहीर करू. पण शशिकांत वारिसेचं हौतात्म वाया जाऊ देणार नाही. आम्ही वारिसे यांना न्याय मिळवून देऊ.

तुमचाही शशिकांत वारिसे करू, संजय राऊत यांना धमक्यांचे फोन; राजकीय वर्तुळात खळबळ
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: कोकणात पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या हत्याकांडावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आवाज उठवल्याने संजय राऊत यांनाही धमक्यांचे फोन आले आहे. तुमचाही शशिकांत वारिसे करू, अशा धमक्या संजय राऊत यांना आल्या आहेत. राऊत यांना फोनवरून या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर, दुसरीकडे राऊत यांनी वारिसे यांची हत्या आर्थिक घोटाळ्यातूनच झाल्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी हा आरोप केला आहे.

मलाही फोन येत आहेत. फोन येत असल्याने मी हा विषय जाहीरपणे घेतला आहे. मलाही धमकी आली. शशिकांत वारिसे प्रकरणात हात घालू नका. तुम्ही हा मुद्दा उचलला तर तुमचाही शशिकांत वारिसे करू, अशी धमकी मला आली आहे. पण मी कोकणात जाणार. वारिसे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहे. त्यांना न्याय देण्यासाठी मी लढणार आहे.

हे सुद्धा वाचा

या संदर्भात आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. त्यांनीही मला कोकणात जाण्याची परवानगी दिली आहे. मीही पत्रकार आहे. संपादक आहे. राज्यात संपादक आणि पत्रकाराची हत्या होत असेल तर ते योग्य नाही, असं संजय राऊत म्हणाले.

जमीनदारांशी कुणाचं साटेलोटं?

शशिकांत वारिसे हे पत्रकार आहेत. ते रिफायनरीला विरोध करत होते. त्यावर ते लिहित होते. रिफायनरीमुळे होणारे नुकसान लोकांना समजावून सांगणार होते. तसेच रिफायनरी येणार म्हणून ज्या ज्या परप्रांतियांनी जमिनी खरेदी केल्या त्यांची माहिती ते देत होते.

तसेच या जमीनदारांशी कुणाचं साटेलोटं आहे, याची माहितीही ते देत होते. त्यामुळे मोठ्या आर्थिक घोटाळ्यातून त्यांची हत्या झाली आहे. रिफायनरीला विरोध करणाऱ्यांना चिरडून टाकण्याची भाषा आहे, असं राऊत म्हणाले.

यादी जाहीर करणार

रिफायनरी येणार त्या भागात कवडीमोल भावात कुणी जमिनी घेतल्या? कोकणातल्या या सर्व जमीनदारांची यादी जाहीर करू. पण शशिकांत वारिसेचं हौतात्म वाया जाऊ देणार नाही. आम्ही वारिसे यांना न्याय मिळवून देऊ. त्यांचं रक्त वाया जाऊ देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यामागे एक सूत्र

15 दिवसांपूर्वी आंगणेवाडीची यात्रा झाली. तिथे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. ते म्हणाले, रिफायनरी आणू. कोण रोखतं ते पाहू. त्यांनी असं म्हणताच 24 तासात वारिसेंची हत्या झाली. याचा अर्थ काय? हा योगायोग नाही. या मागे एक सूत्र आहे. मी काय म्हणतोय हे फडणवीस यांना माहीत आहे. माझं बोट कुणाच्या दिशेने आहे, हे त्यांना माहीत आहे, असं सूचक भाष्यही त्यांनी केलं.