मुंबई: देशात संविधान पायदळी तुडवलं जात आहे. राज्याचे आणि नागरिकांचे अधिकार पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केला आहे. तसेच केंद्र सरकारने आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमावर विरोधी पक्षासोबत शिवसेनाही बहिष्कार टाकत असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. सेंट्रल हॉलमधील कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस जाणार की नाही माहीत नाही. राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी सांगू शकत नाही. पण विरोधी पक्षानेच बहिष्कार टाकला आहे. कारण देशात रोज संविधान पायदळी तुडवलं जात आहे. संविधानाचं राज्य या देशात राहिलं नाही. हुकूमशाही पद्धतीने काम चाललं आहे. राज्य घटनेतील अनेक कलमं विशेषत: राज्याचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत. फेडरल सिस्टिम तोडली जात आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर राजभवनात संविधानाच्या बाबतीत काय चाललंय हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी करता?, असा सवाल राऊत यांनी केला आहे.
हा देश संविधानाच्या माध्यमातून चालावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीत काही मुद्दे मांडले होते. ते महत्त्वाचे आहेत. राज्य आणि जनतेला अधिकार दिले आहेत. पण त्यांचे अधिकारी पायदळी तुडवले जात आहेत. कुठे आहे संविधान? संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ आहे. पण हा धर्मग्रंथ रोज पायाखाली तुडवला जात आहे. त्याची अवहेलना केली जात आहे. आमचं सरकार बहुमतात असूनही आमच्याविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. सरकारने एक दिवसासाठी सेंट्रल हॉलमध्ये संविधान दिवस पाळायचं ठरवलं आहे. आमचा विरोधी पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा आहे. आम्ही कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नाही. बहिष्काराबाबत आम्ही विरोधकांसोबत आहोत. माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंसोबत चर्चा झाली. आमचं ठरलं. आम्ही सर्वांसोबत आहोत, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी एसटीचा संप सुरू नसल्याचा दावा केला आहे. कुठे संप सुरू आहे? नेते निघून गेले आहेत. अनेक कर्मचारी कामावर येत आहेत. काही लोक नौटंकी करत आहेत. करू द्या. कामगार आता कामावर येण्याच्या मनस्थिती आहेत. त्यांना भरघोस वेतनवाढ दिली आहे. विलीनीकरणाचा विषय न्यायालयात आहेत. कामगरांनी कामावर जाण्यातच त्यांचं आणि त्यांचं हित आहे. जे कोणी वकील आहेत. ते कामगारांना भडकावत आहेत. ते कामगारांना जगवायला येणार नाहीत. आम्ही गिरणी कामगारांची अवस्था पाहिली आहे. एसटी कर्मचारीही मराठी बांधव आहेत. त्यांनी शहाणपणाने आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि कामावर यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
संबंधित बातम्या:
Parambir Singh | पुन्हा कसाब का होतोय ट्रेंड? काय आहे परमबीर सिंगावर गंभीर आरोप, तोही माजी एसीपीचा!
चौघा भावांचे केस कापण्यास न्हाव्याचा नकार, घरात घुसून भावंडांकडून निर्घृण हत्या