मुंबई: राज्यातील ठाकरे सरकारने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना (navneet rana) ज्या पद्धतीने वागणूक दिलीय ती गंभीर आहे. गुन्हेगारांनादेखील अशी वागणूक दिली जात नाही. या सरकारने कौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केलं होतं. फडणवीस यांच्या या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पलटवार केला आहे. आता कौर्याची व्याख्या बदलावी लागेल. देशातील गेल्या 7 वर्षातील आणि महाराष्ट्रातील 5 वर्षाच्या अनेक घटनांचा अभ्यास केला तर कौर्य समजून घ्यावे लागेल, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी अयोध्या दौऱ्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली. तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे येत्या 10 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आदित्य ठाकरे 10 जून ला अयोध्येला जाणार आहेत. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून शिवसैनिक अयोध्येला जाणार आहेत. हा राजकीय दौरा नाही. ही आमची श्रद्धा आहे. अयोध्येत शिवसेनेची तयारी सुरू झाली आहे. प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत. जो कोणी नकली भावाने अयोध्येत जात असेल, राजकीय हेतूने अयोध्येत जात असेल, कोणाला कमी लेखण्यासाठी जात असेल तर प्रभू श्रीराम पावणार नाही. त्याला विरोध होतो, असा टोला राऊत यांनी राज ठाकेर यांना लगावला आहे.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातूनच विरोध होत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. कोणी विरोध करत असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशची जनता सुजाण आहे. आम्ही या प्रकरणावर काही बोलणार नाही. आम्हाला त्याचं काही पडलं नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान. आदित्य ठाकरे यांनीही अयोध्या दौऱ्यावर भाष्य केलं आहे. श्री रामाचं दर्शन तर घ्याचच आहे आणि रामराज्यही आणायचं आहे. पण जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्यासाठी गावात फिरून पुढच्या दोन वर्षात कामं कशी पुढे न्यायाची या कडे लक्ष आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.