मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज मोठा दावा केला आहे. राज्याच्या राजकारणात भूकंप होईल असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे शिवसेना सोडणार असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. संजय राऊत पक्ष सोडतील. तसेच ते कोणत्या पक्षात जाणार आणि कधी जाणार याची माहितीही त्यांनी दिली आहे. शिवाय संजय राऊत शिवसेना का सोडणार आहेत? याचं कारणही नितेश यांनी दिलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नितेश राणे यांचा दावा खरा ठरल्यास हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे. नितेश राणे यांनी खास पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे.
येणाऱ्या आठवड्यात राज्यात भूकंप होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा भूकंप होणार आहे. 10 जूनच्या आधी किंवा राष्ट्रवादीच्या वर्धापण दिनी संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी त्यांच्या बैठका झाल्या आहेत. बोलणी झाली आहे. मला ही माहिती सूत्रांनी दिली. संजय राऊत यांच्या गेल्या काही दिवसातील भूमिका पाहा. शरद पवारांच्या राजीनामा आणि नंतरची राऊत यांची भूमिका पाहा. त्यातून तुम्हाला सर्व अर्थ लागतील, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
संजय राऊत सातत्याने अजितदादांवर टीका करत आले आहेत. अजितदादांनी पक्ष सोडला तर मी लगेच पक्षप्रवेश करतो, अशी अटच त्यांनी घातली आहे. त्यामुळे ते सातत्याने अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. टीका करत आहेत. ते फक्त राऊत करत आहेत. उद्धव ठाकरे यांचं खरं नाही. त्यांचा पक्ष राहिला नाही. उद्धव ठाकरे मला खासदार करणार नाही. मला उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात अर्थ राहिला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश द्या, असं राऊत यांनी राष्ट्रवादीला कळवलं आहे, असा दावाही नितेश यांनी केला आहे.
शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय परत घेतला. तेव्हा राऊत यांना पवारांच्या व्यासपीठावर बसायचं होतं. त्यामुळे राऊत सकाळपासून पवारांच्या संपर्कात होते. पण संपर्क होत नव्हता. त्यामुळे राऊत दुपारी 4 वाजता राऊत सिल्व्हर ओकला गेले, असं सांगतानाच राऊत साप आहेत. तुम्ही सापाला दूध पाजत होता. तो बाळासाहेबांचा झाला नाही. तो तुमचा होऊ शकणार नाही. हे आम्ही उद्धव ठाकरेंना सांगतोय, असंही ते म्हणाले. राऊतांनी ठाकरे यांच्या घरात भांडणं लावली. आता राष्ट्रवादीत गेल्यावर उद्धव ठाकरेंना चित्र स्पष्ट होईल. एका माणसामुळे पक्ष फुटला हे त्यांना कळेल, असंही ते म्हणाले.