मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या पात्र अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालावर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. निकाल कुणाच्या पारड्यात जाणार की कोर्ट आणखी काही वेगळा निर्णय देतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सत्ता संघर्षाचा निकाल काय लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. राऊत यांनी सूचक ट्विट केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ… जय महाराष्ट्र!, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सर्वोच्च न्यायालय 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण पुन्हा झिरवळ यांच्याकडेच पाठवणार असल्याचं राऊत यांना आपल्या ट्विटमधून सूचवायचं आहे. त्यामुळे कोर्ट खरोखरच तसा निर्णय देतं का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांनी नंतर पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं आहे.
नरहरी झिरवळ यांनी कायदा आणि घटना तसेच तेव्हाची परिस्थिती पाहून निर्णय दिला. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. आताचे अध्यक्ष सांगतात निर्णय माझ्याकडेच येईल. माझ्याकडे येईल म्हणजे कुणाकडे येईल? तुम्ही बायस आहात. तुम्ही घटनाबाह्य सरकार बनवलं आहे. तुमची नियुक्तीच घटनाबाह्य आहे. त्यामुळे तुमच्याकडे हे प्रकरण येऊ शकत नाही. तो निर्णय तेव्हाच्या अध्यक्षाकडे येईल. यायलाही पाहिजे, असं मला वाटतं, असं संजय राऊत म्हणाले.
आजच्या निकालाबाबत तुम्हाला काय अपेक्षा आहेत? असा सवाल राऊत यांना करण्यात आला. मला काहीच अपेक्षा नाही. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आम्ही न्याय विकत घेत नाही. न्याय विकत घेणारे सत्तेत बसलेले आहेत. आम्ही न्याय विकत घेऊ शकतो असं म्हणणं हा मस्तवालपणा आहे, असं राऊत म्हणाले.
काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ..
जय महाराष्ट्र!
?? https://t.co/PQqCmfWpj8— Sanjay Raut (@rautsanjay61) May 11, 2023
आज 16 आमदार अपात्र होतील. त्यात एकनाथ शिंदेही आहेत. त्यामुळे सरकार जाणार. हे 16 आमदार अपात्र ठरले तर आपोआपच इतर 24 आमदारही अपात्र होतील. म्हणजे 40 आमदार अपात्र होतील, असा दावा संजय राऊत यांनी केला. त्यामुळे खरोखरच हे 16 आमदार अपात्र होतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.