बांगलादेशातील हिंसाचाराचे पडसाद भारतीय राजकारणात सुद्धा दिसून आले. विरोधकांनी याप्रकरणी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. अर्थात बांगलादेशातील घटनेच्या निमित्ताने विरोधकांनी सरकारला इशारा दिला आहे. जनता रस्त्यावर उतरली तर काय होऊ शकते, याविषयीचा सल्ला विरोधक सत्ताधाऱ्यांना देत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना बांगलादेशातील घडामोडींवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी इतर विषयावर पण मतं मांडलीत.
पंतप्रधानांनी बांगलादेशाकडे लक्ष द्यावे
संजय राऊत यांनी बांगलादेशातील हिंसाचारावर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. बांगलादेशात आगडोंब उसळला आहे. याप्रकरणी आता केंद्र सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. बांग्लादेश प्रकरणात विरोधक आता केंद्राने स्पष्ट भूमिका घेण्यासाठी आग्रही झाले आहेत. पंतप्रधान संसदेत यायला तयार नाहीत, असा आरोप राऊत यांनी केला.
तर जनता त्यांना माफ करत नाही
इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेशची निर्मिती केली. लोकशाहीचा मुखवटा लावून देशात जी हुकुमशाही केली जाते तिथे जनता त्यांना माफ करत नाही, एवढंच हसीना यांच्याबाबत बोलता येईल. त्यांनी विरोधकांना जेलमध्ये टाकलं, त्यांनी हुकुमशाही पद्धतीने देश चालवला, त्याचा अंत अशा पद्धतीने झाला, असे मत राऊत यांनी मांडलं. त्यांनी मोदी सरकारला या घटनेवरुन चिमटा काढला.
आज उद्धव ठाकरे दिल्लीत
उद्धव ठाकरे आज दिल्लीत पोहोचत आहेत. पुढील २ दिवसात काही महत्वाच्या गाठी-भेटी आहेत. आज काँग्रेसचे काही प्रमुख नेते त्यांना भेटायला येणार आहेत. मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची देखील ते भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी ते दिल्लीतील मराठी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय खासदारांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.८ तारखेला उपराष्ट्रपती यांनी त्यांना ब्रेकफास्ट साठी बोलावलं आहे ते तिकडे जातील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
प्रकाश आंबेडकरांना टोला
ते म्हणत असतील की शिंदेची शिवसेना खरी आहे तर प्रकाश आंबेडकर यांना कायद्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आम्ही जर म्हंटल रामदास आठवले यांचा पक्ष खारा आहे तर त्यांना किती वेदना होतील ? असा टोला राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला. लोकशाही आहे त्यामुळं त्यांना उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार आहे. त्यांनी लोकसभेला भाजपला पाठिंबा दिला होता. आता ते कोणासोबत आहेत हे शोधावं लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी मनसेच्या निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर दिली.