मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेनेत बंड करून राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतरचा एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे नगरी मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा फलकांनी सजली आहे. बंडानंतरचा शिंदे यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने ठाकरे गट त्यांना शुभेच्छा देतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या शुभेच्छा देताना राज्याच्या परंपरेची आठवणही करून दिली आहे.
व्यक्ती म्हणून, माजी सहकारी म्हणून अनेकांना आपण वाढदिवसाला किंवा त्यांच्या घरातील शुभकार्याला शुभेच्छा देतच असतो. एकनाथ शिंदे आणि नक्कीच एकमेकांचे राजकीय शत्रू आहोत. ते शत्रूत्व कायम राहील. त्यांनी शिवसेना फोडून बाळासाहेबांच्या शिवसेनेचं सत्तेच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण ते होणार नाही. त्याविरोधात लढाई सुरू राहील. पण एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर त्याला शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. त्यामुळे आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आमचे जुने साथी आहेत. त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देणार. त्यात काय एवढं? असं राऊत म्हणाले.
यावेळी त्यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर ठाकरे सरकार कोसळलं नसतं याचा पुनरुच्चार केला. अध्यक्षपदाच्या खुर्चीवर पटोले असते तर चित्रं वेगळं दिसलं असतं. पद अचानक रद्द झालं.
ती संधी विरोधकांना मिळाली. भाजप आणि राज्यपालांनी सरकार पाडण्याचा डाव रचला होता. विधानसभा अध्यक्षपद नाहीये हे हेरलं. राज्यपालांनी निवडणूक होऊ दिली नाही. त्याचा फटका आम्हाला बसला, असं ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपद हे महत्त्वाचं पद असतं. संकट येतं आणि समोर प्रबळ विरोधी पक्ष असतो तेव्हा विधानसभा अध्यक्ष संविधानाच्या चौकटीत राहून बरीच कामे करतो. नाना पटोलेंनी त्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सरकार पाडण्याची संधी विरोधकांना मिळाली.
कारण निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची व्यक्ती पदावर नव्हती. त्यामुळे राज्यपालांनी निर्णय घेतले. पटोले असते तर त्यांनी निर्णय घेतले असते. सरकार पडलं नसतं, असंही त्यांनी सांगितलं.