सध्या महाविकास आघाडीतील प्रवक्त्यांच्या तोफ या एकमेकांविरोधात आग ओतत आहेत. पराभवानंतर उरलासुरला दारूगोळा एकमेकांवर डागण्यात कुठलीही कसर सोडली जात नसल्याचे चित्र आहे. त्यातच आज उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एकला चलो रे चा नारा दिल्याने वादाला तोंड फुटले आहे. तर दुसरीकडे त्यांनी ‘मी मोदींना देव मानतो’, असं वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज दिवसभर संजय राऊत यांच्या स्फोटक वक्तव्याचे पडसाद दिसून आल्यास नवल वाटायला नको.
राऊतांचा शालजोडीतून प्रहार
तर काल पहिल्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग, घटनांचा उलगडा केला. काही इतर प्रश्नांना बगल न देता त्यावर मत मांडले. त्यावेळी त्यांनी आपण एक माणूस असून, आपल्याकडूनही चुका होतात, असे वक्तव्य आले.
त्यावर आज माध्यमांनी खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया घेतली. त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या खास भाषेत या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. मी मोदींना देव मानतो, त्यांना मनुष्य मानत नाही. ज्यांना यापूर्वी देव मानल्या जायचे, त्यांनी स्वतःला मनुष्य म्हटले तरी ते माझ्यासाठी देवच आहेत. विष्णू, ब्रह्मदेव हे देवच आहेत, त्यांना मनुष्य कसं म्हणता येईल, असा खोचक टोला त्यांनी लगावला. त्यांनी मोदींना उपरोधिक टोला लगावला. आता त्यांच्या या वक्तव्याने भाजप गोटातूनही विरोधी प्रतिक्रिया येणे स्वाभाविक मानल्या जात आहे.
महाविकास आघाडीत तोफांची दिशा बदलली
लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर स्तुति सुमनं उधळणारे महाविकास आघाडीतील नेते सध्या बैचेन दिसत आहे. विधानसभेत अति आत्मविश्वास नडला. गाफिल राहणे भोवले हे मान्य करतानाच आता त्यांनी तोफांची दिशा बदलली आहे. त्यांनी एकमेकांविरोधात दारूगोळा वापरायला सुरूवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केल्यानंतर दोन दिवसांपासून महाविकास आघाडीतील बेबनाव समोर येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी पण या वादात उडी घेतली आहे. तर संजय राऊत यांनी पण काँग्रेसचा पंचनामा केल्याचे समोर येत आहे.