महायुतीने राज्यात अडीच वर्षांपूर्वी सर्जिकल स्ट्राईक करत सत्ता काबीज केली. त्या काळात दोन पक्षांचे सरकार होते. पुढे त्यात अजितदादा यांची राष्ट्रवादी दाखल झाली. महायुती विधानसभेला सामोरं गेली. त्यात जोरदार यश मिळवलं. 288 पैकी 232 जागांवर महायुतीने घवघवीत यश मिळवलं. या विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून अत्यंत चुरशीच्या लढतीत संजय शिरसाट यांनी मोठ्या मताधिक्यांनी हा सामना जिंकला. त्यांनी गेल्या अडीच वर्षात मंत्री पद नसताना सुद्धा संयम दाखवला. पक्षाची, एकनाथ शिंदे यांची बाजू हिरारीने मांडली. महाविकास आघाडीच्या आरोपांना दररोज त्यांनी प्रत्युत्तर दिले. इतर मंत्र्यासोबत शिंदे सेनेची प्रखर बाजू मांडली. महाविकास आघाडीवर हल्लाबोल चढवला. आता त्यांच्या या सर्व कष्टाला यशाचे कोंदण लागले आहे. त्यांचा मंत्रिपदाचा वनवास आता संपुष्टात आला आहे. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
मंत्रिपदाची हुलकावणी
गेल्या मंत्रिमंडळात मंत्री पदासाठी ते इच्छुक होते. पण त्यांना मंत्री पदाने सातत्याने हुलकावणी दिली. मंत्रिपदाऐवजी त्यांना सिडकोच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. तरीही संयम ठेवत त्यांनी अनेकदा संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेकांना अंगावर घेतले. मुद्देसुद मांडणी आणि आक्रमक भाषा ही त्यांची वैशिष्ट्ये आहे. पण त्यांनी संयम ढळू दिला नाही. वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून आला. यावेळी त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली नाही. त्यांना या कार्याचे बक्षीस मिळाले आहे.
कोण आहेत संजय शिरसाट
संजय शिरसाट हे रिक्षा चालक होते. बाळासाहेबांच्या विचाराने ते अत्यंत भारावले. ते शिवसेनेत दाखल झाले. छत्रपती संभाजीनगरमधील बन्सीलाल नगर, कोकणवाडी परिसरातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. या भागातून ते 2000 मध्ये नगरसेवक झाले. पुढे सभागृह नेते म्हणून त्यांनी महापालिकेत काम पाहिले. ते शिवसेना विभाग प्रमुख पण होते.
2009 मध्ये ते पहिल्यांदा औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर दुसर्यांदा 2014 आणि 2019 मध्ये ते याच मतदार संघातून निवडून आले. चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले होते. त्यांना पाडण्यासाठी महाविकास आघाडीने मोठी फिल्डिंग लावली होती. त्यांच्याविरोधात राजू शिंदे हे उभे ठाकले होते. पण सर्व अंदाज चुकवत संजय शिरसाट हे विजयी झाले. शिंदे सेनेच्या बंडानंतर त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून जोरदार खिंड लढवली आणि आता त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे.