महाराष्ट्रात नवं सरकार अस्तित्वात कधी येणार? याची चर्चा होत आहे. एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरेगावात आहेत. खातेवाटपावर नाराज असल्याने शिंदे दरेगावात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. अशातच आता आज शिंदे मुंबईत येणार आहेत. तसंच शिवसेनेच्या नेत्यांना ते भेटणार आहेत आणि संध्याकाळी महायुतीची देखील महत्त्वाची बैठक आज होणार असल्याचं कळतं आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते, छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे.
एकनाथ शिंदे हे आज दुपारनंतर मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल. उद्या दुपारपर्यंत कोणती खाती कुणाला मिळतील, यावर अधिकृतरित्या शिक्का मुहूर्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पुढची 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दाढीवरून हात फिरवतात. तेव्हा तेव्हा राष्ट्रामध्ये मोठ्या काहीतरी घडतं आणि त्यामुळे ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेता कामा नये. हेच हलक्यात घेण्याचं काम ठाकरेंनी केलं आणि आता त्यांची काय अवस्था आम्ही करून ठेवली हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे जेव्हा शिंदे मुंबईत येतील. तेव्हा सगळ्या घडामोडी घडतील. कोणी त्यांना हलक्यात घेता कामा नये, असा इशारा शिरसाटांनी दिला आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यालाही संजय शिरसाटांनी उत्तर दिलं आहे. राज्यात चांगलं काम व्हावं. यासाठी या खात्यांवरती आम्ही दावा केलेला आहे. संजय राऊत आणि त्यांचे पक्षांनी आमच्यावर जो लिंबू फिरवला होता. त्याचा उतारा करण्यासाठी एकनाथ शिंदे दरेगावी गेलेत. शेतकऱ्याच्या मुलाचा अपमान करणं एकीवर एकच काम संजय राऊतला आहे. संजय राऊतमुळेच शिवसेना ठाकरे पक्ष संपला. संजय राऊतांमुळेच शरद पवार यांच्या पक्षाला फटका बसला आणि अजूनही त्याची बडबड सुरूच आहे, असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.