मुंबई : ईडीने गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा धाडसत्र सुरू केलं आहे. मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून ईडीने 16 ठिकाणी छापेमारी केली. राजकीय नेते आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरी ही छापेमारी करण्यात आली आहे. महापालिकेच्या तीन बड्या अधिकाऱ्यांसह ठाकरे गटाच्या एका नेत्याच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. तसेच ठाकरे गटाशी संबंधित एकाच्या घरीही छापेमारी करण्यात आली आहे. ही सर्व छापेमारी कोरोना काळात झालेल्या कोव्हिड सेंटरच्या घोटाळ्याशी संबंधित आहे. या छापेमारीत एका महापालिका अधिकाऱ्याकडे कोट्यवधीचं घबाड सापडलं आहे. या अधिकाऱ्याची फक्त एफडीच 15 कोटींची असल्याचं उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या घरी ईडीने दोन दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. कोव्हिड काळातील घोटाळ्या संदर्भात ही छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीत ईडीच्या हाती घबाड लागलं आहे. ईडीने संजीव जैस्वाल यांच्या घरी छापेमारी केली असता 100 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. तसेच 15 कोटींच्या एफडीची कागदपत्रेही ईडीच्या हाती लागली आहेत. या शिवाय जैस्वाल यांच्या घरात ईडीला 13 लाखाची रोख रक्कमही सापडली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जैस्वाल यांच्याकडे एकूण 100 कोटींची संपत्ती सापडली आहे.
जैस्वाल यांची 15 कोटींची एफडी आहे.
त्यांच्या पत्नीकडे 34 कोटींची संपत्ती आहे.
मढ आयलंडला त्यांचा अर्ध्या एकरचा भूखंड आहे.
जैस्वाल यांनी एवढी मोठी रक्कम घरात ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच जैस्वाल यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून? याचा तपासही ईडी करत आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्ताच्या घरी एवढ्या मोठ्या प्रमाणात माया मिळणं ही पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जात आहे.
या छापेमारीनंतर ईडीने जैस्वाल यांना काल चौकशीसाठी बोलावलं होतं. पण जैस्वाल ईडीच्या कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यांनी ईडीकडे चार दिवसांचा वेळ मागितला आहे. चार दिवसानंतर जैस्वाल ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, जैस्वाल यांच्या घरी मोठं घबाड सापडल्याने त्यांच्या गळ्याभोवतीचा फास आवळला गेला आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीत आणखी काय माहिती मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोरोनाच्या काळात संजीव जैस्वाल हे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. या काळात लाईफलाईन सर्व्हिस लिमिटेड या सुजीत पाटकर यांच्या कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं. हे कंत्राट चुकीच्या पद्धतीने देण्यात आलं असून त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं जात आहे.
या संदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात होता. हा तपास सुरू असतानाच ईडीने हे प्रकरण हातात घेतल्याने महापालिका अधिकारी आणि राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत.