बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन सुरू आहे. अखिल भारतीय सरपंच परिषद याप्रकरणी आक्रमक झाली आहे. परिषदेच्यावतीने संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून काम बंद आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी चौभे पिंपरी येथे त्यांना श्रध्दांजली वाहिली.
राज्यभर निषेधाचा वणवा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्यावतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव ग्रामपंचायतीचे काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यात आज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्व ग्रामपंचायत बंद ठेवण्यात आला. यावेळी आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सरपंचासाठी वेगळा संरक्षण कायदा राज्य सरकारने करावा अशी मागणी धाराशिव जिल्ह्यातील सरपंचांनी केली आहे.
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, भुसावळसह अनेक ग्रामीण भागातील ग्रामपंचायती आज बंद आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली आहे. आज ग्रामपंचायतीचे कामकाज बंद आहे. अनेक ग्रामपंचायतींना कुलूप लागले आहे.
पोलीस यंत्रणेवर दबाव
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील ग्रामपंचायत पण काम बंद आंदोलनात सहभागी झाली आहे. मस्साजोग येथील ग्रामपंचायत सदस्य गावकरी आंदोलनात सहभागी झाले. वाल्मीक कराडवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. वाल्मीक कराडवर गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासन तपास करत आहे पण त्याला वेग नाही, अजून पण एक आरोपी सापडला नाही. पोलीस यंत्रणेवर दबाव आहे हे स्पष्ट कळत, लॉकअपमधील आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देत आरोपीला मदत करणारे लोक अजून बाहेर आहेत हे कशामुळे, असा सवाल गावकऱ्यांनी केला आहे.
घटना घडल्यापासून आमची ग्रामपंचायत बंद आहे, माझा ग्रामपंचायत काम बंद आंदोलन संप पुकारण्यात आला. आम्ही विरोधी ग्रामपंचायत सदस्य असतांना सुद्धा, पूर्ण गावांना सोबत घेऊन काम ते करायचे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी त्यांच्या विरोधात होतो पण मी विरोधात आहे हे त्यांनी आम्हाला कधी कळू दिले नाही, अशी प्रतिक्रिया सदस्यांनी दिली.
संतोष देशमुख यांची हत्या होऊन फक्त त्यांच्या कुटुंबियांचा नुकसान नाही झालं तर सगळ्या गावाचं नुकसान झालं आहे. संपूर्ण गावाचे भविष्य आता अंधारात आहे, पळून जाण्यास मदत करणाऱ्या सगळ्यांना अटक झाली पाहिजे. खंडणी प्रकरणामुळेच ही हत्या झाली, वाल्मीक कराडवर 302 चा गुन्हा नोंदवावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
संरक्षण कायदा लागू करा
संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशी झाली पाहिजे. देशमुख कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत समाविष्ट करावे. त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांना संरक्षण कायदा लागू करावा यासह विविध मागण्या करत काम बंद आंदोलन सुरू केल्याची माहिती सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.