सत्यपाल मलिक उद्धव ठाकरे यांच्या भेटीला; भाजपवर घणाघाती टीका करत म्हणाले, सरकार तर…

| Updated on: Sep 22, 2024 | 12:58 PM

Satyapal Malik Meets Uddhav Thackeray : सत्यपाल मलिक यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांबाबत चर्चा केली. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सत्यपाल मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

सत्यपाल मलिक उद्धव ठाकरे यांच्या भेटीला; भाजपवर घणाघाती टीका करत म्हणाले,  सरकार तर...
उद्धव ठाकरे, सत्यपाल मलिक
Image Credit source: tv9
Follow us on

महाराष्ट्राची विधानसभा निवडणुकीच्या आधी घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. जम्मू- काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. ‘मातोश्री’ निवासस्थानी जात मलिक यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि सत्यपाल मलिक यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. ही भेट झाल्यानंतर सत्यपाल मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मलिक यांनी आगामी निवडणुकीवर भाष्य केलं. तसंच भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

आगामी निवडणुकीवर भाष्य

मुंबईत माध्यमांशी बोलताना सत्यपाल मलिक यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा आणि भाजपचा सुफडासाफ होणार आहे, असं सत्यपाल मलिक म्हणाले. तसंच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माझा महाविकास आघाडीला पाठिंबा असेल. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मी प्रचार सभांसाठी येणार आहे, असंही सत्यपाल मलिक यांनी सांगितलं आहे.

हरियाणा निवडणुकीवर भाष्य

सत्यपाल मलिक यांनी कालही राज्याच्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं होतं. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक देशातील राजकीय परिस्थितीवर परिणाम करेल, असं मलिकांनी म्हटलं. मुंबईतील नागरिक संस्थेच्या कार्यक्रमात सत्यपाल मलिक बोलत होते. सत्यपाल मलिक यांनी हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. काँग्रेस हरियाणामध्ये जवळपास 60 जागा जिंकेल. तर भाजप केवळ 20 जागा जिंकेल. 2019 च्या पुलवामाच्या हल्ल्यात 40 सीआसपीएफ जवानांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची व्यापक चौकशी व्हावी. मी पुलवामा हल्ल्याच्या चौकशीची मागणी करत आहे. लोकांना कळलं पाहिजे की आपले जवान कसे मारले गेले… जवान शहीद होण्याला कोण जबाबदार आहे? हे लोकांच्या समोर आलं पाहिजे, अशी मागणीही सत्यपाल मलिक म्हणालेत.

भाजपवर हल्लाबोल

भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग करत आहे. पुलवामामध्ये हल्ला झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी भाजपने या घटनेचं राजकीयकरण केलं. त्यामुळे लोकांनी मतदान करताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे.