नवी मुंबई : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेतच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाशीतील मॉडर्न शाळेत मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. सायली अभिमान जगताप (Sayli Jagtap) असं या विद्यार्थीनीचे नाव आहे. सायली सकाळी चाचणी परिक्षा देण्यासाठी शाळेत गेली होती त्यावेळी शाळेतच तिचा मृत्यू झाला.
सायलीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी अभ्यासाच्या तणावातून तिचा मृत्यू झाला की अन्य कारणाने हे अद्याप समजू शकलेलं नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच याबाबतची स्पष्टता होणार आहे.
सायली जगताप ही आरपीआय तुर्भे विभाग अध्यक्ष अभिमान जगताप यांची कन्या होती. जगताप कुटुंब तुर्भे स्टोअर्स विभागात राहतं. सायली वाशीतील मॉडर्न शाळेत इयत्ता दहावीत शिकत होती. शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांची चाचणी परिक्षा सुरु असल्याने सायली मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे परीक्षेसाठी शाळेत गेली होती.
सायली आपल्यासोबत बॅग घेऊन परीक्षा हॉलमध्ये गेल्याने शिक्षकांनी तिला सोबत आणलेली बॅग वर्गाबाहेर ठेवण्यास सांगितलं. त्यामुळे सायली वर्गाबाहेर बॅग ठेवण्यासाठी गेली असता, त्याच ठिकाणी ती अचानक कोसळून खाली पडली.
यावेळी सायलीला फिट आल्याचे समजून शाळेतील शिक्षकांनी तिला उचलून वर्गात नेले. त्यानंतर तिला व्होकार्ड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या प्रकाराने शाळेत एकच खळबळ उडाली.