मुंबई : मुंबईच्या सांताक्रूझमधील पोदार स्कूलमधील (Podar School in Santacruz) काही विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर स्कूल बसनं (School Bus) निघाले. मात्र बराच वेळ घरी परतले नव्हते. स्कूल बसने हे विद्यार्थी (School Students) शाळा सुटल्यानंतर घरी परतं अपेक्षित होतं. मात्र तसं न झाल्यानं पालकांना चिंता वाटू लागली. त्यानंतर 12.30 वाजल्यापासून शाळेची स्कूलबस नॉट रिचेबल असल्यानं काळजी आणखीनंच वाढली होती. अस्वस्थ झालेल्या पालकांनी अखेर शाळा गाठली आणि जाब विचारला. संतापलेल्या पालकांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं पालकांच्याही संतापाचा पारा आणखीनंच वाढत गेला. अखेर ही मुलं आता घरी परतली असल्याची माहिती समोर आली आहे. सांताक्रूझ पोलिसही शाळेच्या आवारत ही घटना समजल्यानंतर दाखल झाले होते. मात्र मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पालकांनी अनेक सवालही उपस्थित केलेत.
12.30 वाजता शाळेतून सुटलेली बस ही 4.30 वाजता अखेर कुठे आहे, हे समोर आलं. मात्र एवढा वेळ ही स्कूल बस कुठे होती, असा प्रश्न पालकांनी शाळेच्या प्रशासनासमोर मांडलाय. यावेळी पालक आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाचीही झाल्याचा व्हिडीओही समोर आला आहे.
12.30 वाजता शाळेतून सुटलेली बस बराच वेळ परतली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक अस्वस्थ झाले होते. नेहमी जी स्कूल बस दारातून विद्यार्थ्यांना घेऊन जाते आणि आणून सोडते, त्या स्कूलबसला उशीर का झाला, असा प्रश्न पालकांना पडला होता.
मात्र बराच वेळ स्कूल बसच्या ड्रायव्हरशीही संपर्क होऊ शकला नव्हत. तब्बल तीन तास ही स्कूल बस नॉट रिचेबल होती. दरम्यान, 4.30 वाजण्याच्या सुमारास स्कूलबस आणि विद्यार्थी सुखरुप परतले असल्याची माहिती समोर आली आहे. मुलं वेळेत घरी न पोहोचल्यानं विद्यार्थ्यांनी पालकांनी शाळा गाठली होती.
पोदार ही सांताक्रूझमधील एक प्रतिष्ठीत शाळा आहे. महागडी फी देऊन मुलांना शाळेत पाठवणाऱ्या पालकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाळेच्या फॅसिलीटीसाठी एवढे पैसे भरतो, पण मग अशी निष्काळजीपणा का?, असा सवाल पालकांनी उपस्थित केलाय. दरम्यान, काही विद्यार्थ्यांना सिग्नलवर तर काही विद्यार्थ्यांना दुसऱ्याच परिसरात उतरवण्यात आलं होतं. त्यामुळे मुलांसोबत झालेल्या या प्रकारने सगळ्याच पालकांची चिंता वाढवली आहे. स्कूलबसच्या विश्वासार्हतेवरही या घटनेनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे या स्कूलबसमधील सर्व मुलं आता सुखरुप घरी परतली आहेत.
या संपूर्ण प्रकाराबाबत आशिष शेलार यांनी ट्वीट करत अधिक माहिती दिली आहे. स्कूलबसचा ड्रायव्हरव नवीन असल्यामुळे हा सगळा घोळ झाल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांनी म्हटलं आहे की,…
सांताक्रूझ येथील पोदार शाळेची बस बेपत्ता प्रकरणी मी पोलीस आयुक्त, डिसीपी या पोलीस यंत्रणांसह शाळेच्या प्रशासनाशी तातडीने बोललो… त्यातून जी माहिती समोर आली त्यानुसार बसचा ड्रायव्हर नवीन असल्याने नेहमीच्या मार्गापेक्षा अन्य मार्गाने बस गेली. विद्यार्थी सुखरूप असून आपापल्या पालकांकडे पोहचले आहेत. चिंता करण्याचे कारण नाही, असे पोलीस, शाळा यांनी सांगितले आहे. जरी असे असले तरी संबंधित ड्रायव्हर, बसचा कंत्राटदार यांच्यावर कारवाई करा, असे शाळेच्या प्रशासनाला सूचित केले आहे.
सांताक्रूझ येथील पोदार शाळेची बस बेपत्ता प्रकरणी मी पोलीस आयुक्त, डिसीपी या पोलीस यंत्रणांसह शाळेच्या प्रशासनाशी तातडीने बोललो…
त्यातून जी माहिती समोर आली त्यानुसार बसचा ड्रायव्हर नवीन असल्याने नेहमीच्या मार्गापेक्षा अन्य मार्गाने बस गेली.
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 4, 2022