मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा (ravi rana) यांच्याविरोधात राजद्रोहाचं कलम लावण्यात आलं आहे. त्यावर सकारात्मक आणि नकारात्म प्रतिक्रिया उमटत आहेत. ब्रिटीश काळातील हे कलम आता असण्याची गरज आहे का? असाही सूर उमटू लागला आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनीही या कलमाचा गैरवापर होत असल्याचं मान्य केलं आहे. पण खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना लावण्यात आलेल्या या कलमाचं त्यांनी समर्थन करत राज्य सरकारची पाठराखण केली आहे. हे जे कलम आहे 124 अ वगैरे. त्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होतोय. महाराष्ट्रात भीमा कोरेगाव दंगलीनंतर काही लोकांवर हे कलम लावलं. त्यावरही देशात चर्चा सुरू आहे. आता प्रश्न राहिला एका दाम्पत्याचा. या दाम्पत्याने महाराष्ट्रात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करून दंगली भडकवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात कारस्थान रचलं होतं. त्याला एका पक्षाची ताकद होती. त्यामुळे त्यांच्यावर जे कलम लावले आहेत. त्यावर वाद होऊ नये, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेवरही भाष्य केलं. महाराष्ट्रात अनेक सभा होतात. आम्हीही सभा घेतो. राष्ट्रवादीची कोल्हापुरात मोठी सभा झाली. महाराष्ट्राला सभेचे वावडे नाही, असं सांगतानाच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच पालन करावं ही सरकारची भूमिका आहे. राज्यातील भोंग्यांचं वातावरण हे राजकीयदृष्ट्या तापवलं जात आहे. योगी कोण आणि भोगी कोण? हा संशोधनाचा विषय आहे. हा बदल कसा झाला हा संशोधनाचा विषय, अशी टीका राऊत यांनी केली.
सोमय्यांना काय गंभीर घ्यायचं?
यावेळी राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली. एक गुन्हेगार आहे जो जामिनावर सुटला आहे. त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं? देशाच्या पैश्यांचा अपहार केला आहे. सध्या देशात दिलासा घोटाळा चालू आहे. त्याचाच तो लाभार्थी आहे. त्यामुळे त्यांच्या याचिकेला एवढं काय गंभीर घ्यायचं? असा सवाल त्यांनी केला.