मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या हेरीटेज गॅलरी पाहण्यासाठीच्या तिकीट दरात घसघशीत कपात केली आहे. तसेच ही गॅलरी पाहण्याची वेळही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ही हेरीटेज गॅलरी पाहण्यासाठी मुंबईकरांना अधिक वेळ मिळणार आहे. येत्या 30 जानेवारीपासून या हेरीटेज गॅलरीला पाहण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांसह मुंबईकरांचा फायदा होणार आहे.
मुंबईकरांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या हेरिटेज गॅलरीच्या वेळेत बदल करीत वेळेत वाढ करण्यात आली आहे. नव्या निर्णयानूसार हेरीटेज गॅलरी पाहण्यासाठी तिकीटाच्या काऊंटरची वेळ आता सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत करण्यात आली आहे. तर गॅलरी पाहाण्याची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 अशी बदल्यात आली आहे.
हेरीटेज गॅलरीच्या प्रवेशाचे तिकीट दरही कमी करण्यात आले असून आता प्रोढ व्यक्तींसाठी प्रत्येकी 50 रूपये तर विद्यार्थ्यांसाठी 20 रूपये तिकीट दर करण्यात आला आहे. याआधी प्रोढांसाठी 200 रू. तर विद्यार्थ्यांसाठी 100 रूपये तिकीट दर होते. कोविड काळाआधी या गॅलरीला दररोज 10 जण तर 22 ऑक्टोबर ते आतापर्यंत दररोज सरासरी 12 जणांनी भेट दिली आहे. 13 मार्च 2020 रोजी कोविड साथीमुळे गॅलरीला बंद ठेवण्यात आले, नंतर 17 ऑक्टोबर 2022 पासून हे हेरीटेज संग्रहालय पुन्हा सुरू करण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सूतार यांनी स्पष्ट केले.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त हेरिटेज गॅलरीला भेट दिली देत हेरिटेज गॅलरीत ठेवलेल्या ऐतिहासिक वस्तू आणि कलाकृतींचे कौतुक केले. इतिहास प्रेमीं हितासाठी हेरिटेज गॅलरीचा प्रसार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या हेरीटेज इमारतीतील गॅलरीत अनेक ऐतिहासिक दस्ताऐवज तसेच ब्रिटीशकालीन वस्तूंचे जतन करण्यात आले आहे.
या म्युझियममध्ये भारतीय रेल्वेच्या बोरीबंदर ते ठाणे या पहिल्या प्रवासाचे तसेच ब्रिटीशांनी रेल्वे मार्ग उभारणी स्थापन केलेल्या ग्रेट इंडीयन पेनिनसुला रेल्वे कंपनी ( GIPR) स्थापना करण्यासाठी लंडनच्या संसदेत झालेले ठरावाची प्रत, तसेच माथेरानच्या नॅरोगेज रेल्वे मार्गांसह अनेक दस्ताऐवज आणि अनेक पुरातन वस्तूंचे जतन केले आहे.
नवे तिकीट दर
प्रोढांसाठी – 50 रूपये
विद्यार्थ्यांसाठी – 20 रूपये
तिकीट खिडकीची नवीन वेळ
सकाळी 11 ते दुपारी 4 ( पहाण्याची वेळ स.11 ते सायं. 5 )
या इमारतीच्या तळमजल्यावरील हेरीटेज गॅलरीत बोरीबंदर ते ठाणे 16 एप्रिल 1853 रोजी धावलेल्या पहील्या झुकझुक गाडीचा इतिहास जतन करण्यात आला आहे. हा ऐतिहासिक ठेव्याचा आनंद रेल्वेप्रेमी तसेच विद्यार्थ्यांना अवघ्या पन्नास ते वीस रूपयांच घेता येणार आहे.
गेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेची ( GIPR) स्थापना 1 ऑगस्ट 1849 रोजी ब्रिटिश संसदेत कायदा पास करून करण्यात आली होती, या कंपनीचे भाग भांडवल £50,000 पाऊंड होते. 17 ऑगस्ट 1849 रोजी, मुंबईला खान्देश, बेरार आणि इतर प्रेसिडेन्सीशी जोडण्यासाठी 56 किमी लांबीची प्रायोगिक लाईन, ट्रंक लाईन बांधण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीशी औपचारिक करार केला. ,या उद्देशासाठी, ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक न्यायालयाने जेम्स जे. बर्कले यांची मुख्य निवासी अभियंता म्हणून नियुक्ती केली आणि त्यांचे सहाय्यक सीबी कार आणि आरडब्ल्यू ग्रॅहम होते. त्याचे व्यवस्थापन 1 जुलै 1925 रोजी सरकारने ताब्यात घेतले. 5 नोव्हेंबर 1951 रोजी मध्य रेल्वे म्हणून त्याचा समावेश करण्यात आला.