राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील तहसील कार्यालयांवर प्रचंड गर्दी झाली आहे. रोजच ही गर्दी होत असल्याने तहसील कार्यालयातही कामाचा लोड वाढला आहे. तसेच सर्व्हर डाऊन होण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे दिवसभर रांगा लावून सर्व्हर डाऊन झाल्याने घरी जावं लागत असल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मोलमजुरी सोडून या महिला तहसील कार्यालयात येत असल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जाण्याची आणि रांगा लावण्याची गरज पडणार नाहीये.
राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतची मोठी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता महिलांना अर्ज करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आम्ही ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी आणि महिलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सातारा पॅटर्न राबवणार आहोत. या पॅटर्ननुसार आमची पथके घरोघरी जाणार आहेत. घरोघरी जाऊन शक्ती अॅपवर अर्ज भरून घेणार आहेत. त्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे महिलांना कुठे जावं लागणार नाही, कुठेही अर्ज करण्याची गरज पडणार नाही, असं शंभूराज देसाई म्हणाले. सोमवारपासून त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, विधानसभेतही लाडकी बहीण योजनेवर प्रश्न विचारले गेले. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तरे दिली. पृथ्वीराज बाबा तुम्ही म्हणालात 1500 रुपये कसेल देता 5 हजार द्या. बाबा तुम्ही मुख्यमंत्री होता, तेव्हा दमडीही दिली नाही. बाबा सांगतात, आम्ही केंद्रात सत्तेत आलो असतो तर महिना साडे आठ हजार दिले असते. जर एवढं द्यायचं झालं तर अडीच लाख कोटी लागतील. आपलं बजेट किती?, असा सवाल अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना केला.
अजित पवार शब्दाचा पक्का आहे. हा अजित दादांचा वादा आहे. कधी खोटं बोलत नाही. केंद्रातील योजना असली तरी हिशोब काढा. 25 लाख कोटी लागतील. काहीही पण न पटेल असे बोलू नका. 2003 आणि 2004 मध्ये सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते. त्यांनी मोफत बिलाची घोषणा केली. एकदा मोफत वीज दिली. नंतर ती योजना बंद केली. म्हणाले चुनावी घोषणा आहे. आम्ही त्यावेळी दुसऱ्या रांगेत बसायचो. त्यामुळे आमचं फार चालत नव्हतं, असा टोला अजितदादांनी लगावला.
दरम्यान, सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. भाजपचे कार्यकर्ते मुस्लिम आणि हिंदू महिलांकडून पैसे घेत असल्याने आम्ही मोफत अर्ज भरून देतोय, असं काँग्रेसचे कार्यकर्ते शोएब महागामी यांनी सांगितलं. एकीकडे काँग्रेस नेत्यांनी योजनेच्या नावाखाली महिलेची लूट होत असल्याचा आरोप केला होता. तर दुसरीकडे मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांकडून लाडली बहीण योजनेचा फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अर्ज भरून घेण्यासाठी वेगवेगळ्या सेंटरवर मोठ्या प्रमाणात महिलांची लूट होत आहे. ही लूट थांबावी म्हणून आम्ही या ठिकाणी मोफत अर्ज भरून देत आहोत. भाजपच्या काही कार्यकर्त्याकडून महिलांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. भाजपाचे कार्यकर्ते मुस्लिम महिलांकडून हजार रुपये तर हिंदू महिलांकडून पाचशे रुपये घेत आहेत. ही लूट होऊ नये म्हणून आम्ही हे अर्ज सर्वधर्मीय महिलांना मोफत भरून देत आहोत, असंही शोएब महागामी यांनी सांगितलं.