Sharad Pawar : एका दगडात अनेक पक्षी; देवेंद्र फडणवीसांना गोलीगत झटका, तर अजित पवारांना थोरले पवार अशी देणार मात

| Updated on: Sep 04, 2024 | 3:43 PM

Vidhansabha Election 2024 : अजित दादा महायुतीत आहेत. लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी भाजपमधील काही नेत्यांना त्यांच्या भविष्याची चिंता लागली आहे. विधानसभेला एकाच मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी उसळली आहे. भाजपमध्ये बंडखोरीचे ढोल वाजत आहेत. नगारे वाजायला अजून दोन-तीन महिने काय तो अवकाश आहे...

Sharad Pawar : एका दगडात अनेक पक्षी; देवेंद्र फडणवीसांना गोलीगत झटका, तर अजित पवारांना थोरले पवार अशी देणार मात
शरद पवार यांचा हाबाडा, आता खेला होबे
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची घोषणा अजून बाकी आहे. पण राजकारण तापायला लागले आहे. शरद पवार यांनी पहिला डाव टाकला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस, भाजपला हाबाडा दिला आहे. आता ते अजित पवार यांना धोबीपछाड देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेसाठी बांधणी सुरु केली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईत महायुतीला गुंतवून महाविकास आघाडीला खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात आघाडी मिळवून देण्याचे धक्कातंत्र पण वापरण्याची चर्चा रंगली आहे. मोठ्या मुसंडीसाठी राजकारणाची पटकथा तयार होत आहे. बुद्धिबळाच्या डावात महायुती चितपट करेलच पण पहिली चाल पवारांनी खेळली आहे.

कोल्हापूरचा पैलवान कोण?

समरजितसिंह घाटगे यांनी मंगळवारी भाजपची साथ सोडली. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील झाले. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा निवडणुकीत घाटगे यांनी शड्डू ठोकले आहेत. घाटगे यांना केवळ निवडणुकीचे तिकीटच नाही तर सत्ता आल्यास मंत्रीपद देण्याचे संकेत मिळत आहेत. या घाडमोडीमुळे अजित पवार आणि मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा

घाटगे यांचा भाजपला रामराम का?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समरजितसिंह घाटगे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांना आश्वासन दिलं. पण कागलमधूनच लढायचं घाटगे यांनी निश्चित केलं होतं. कागल विधानसभेसाठी अजित पवार गटाला मिळणार हे जवळपास निश्चितच होतं. कारण या ठिकाणाहून हसन मुश्रीफ सलग पाच वेळा निवडणून आले आहेत. त्यामुळे या जागेसाठी ते प्रबळ दावेदार होतेच. घाटगे यांना मागच्या दाराने आमदारकीची ऑफर होती, पण ती त्यांना मान्य नव्हती.

दोन डझन जागांवर होणार खेला होबे

भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने घाटगे यांनी पक्षाला रामराम ठोकला. ते शरद पवार खेम्यात दाखल झाले. राज्यात जवळपास अशा दोन डझन जागा आहेत. तिथे असा पेच आहे. याठिकाणी भाजपमधील नेते अजित पवार गटातील उमेदवारासारखेच तिकिटाच्या शर्यतीत आहेत. कारण 2019 मध्ये भाजपच्या स्थानिक उमेदवारांनी त्यावेळी राष्ट्रवादीला मोठे आव्हान उभे केले होते. या 24 जागांवर पवार खेला होबे करु शकतात. त्यात अजित पवार गट आणि भाजपचं मोठं नुकसान होऊ शकतं. पवार दोन्ही गटातील मातब्बर नेत्याला आपल्याकडे ओढून महायुतीला खिंडार पाडू शकतात. ही पळवापळवी थांबवणं हेच महायुतीसमोर मोठे आव्हान असू शकतं.

राज्यात या रस्सीखेचमुळे विधानसभेचे गणित बिघडू शकते. यामध्ये इंदापूर, उदगीर, वाई, परळी, वडगाव शेरी, मावळ, हडपसर, अहमदपूर, अमळनेर, अर्जुनी मोरेगाव, अहेरी, विक्रमगड, अकोलेसह एकूण 21 जागांवर थोरले पवार डाव टाकण्याची शक्यता आहे. याठिकाणी 2019 मध्ये भाजप उमेदवाराचा पराभव करुन राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी आणि भाजप हे परंपरागत विरोधी आहेत. अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्याने परंपरेला छेद मिळाला. पण सत्तेची गणितं बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे.