मुंबई | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत 2 महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. आरोग्याच्या कारणामुळे न्यायलयाने जामीन दिला. नवाब मलिक यांची या जामीनामुळे जवळपास 1 वर्ष 5 महिन्यांनी सुटका झाली. नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाल्याने अजित पवार गटाच्या कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले. यावेळेस कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांना जामीन मिळाल्याच्या आनंदात एकमेकांना पेढे भरवले. तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटातील नेत्यांनी नवाब मलिक यांच्या जामीनावर प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विटद्वारे मलिक जामीनावर प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे यांचं ट्विट
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाबभाई मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला, हि आनंदाची बाब आहे. न्यायालयाच्या या निकालाचे आम्ही सर्वजण स्वागत करतो. ते निर्दोष असून त्यांना केवळ राजकीय कारणांमुळे तुरुंगात ठेवण्यात आले आहे हे स्पष्ट आहे. आम्हा सर्वांचा न्यायव्यवस्थेवर…
— Supriya Sule (@supriya_sule) August 11, 2023
“राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाबभाई मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला, ही आनंदाची बाब आहे. न्यायालयाच्या या निकालाचे आम्ही सर्वजण स्वागत करतो. ते निर्दोष असून त्यांना केवळ राजकीय कारणांमुळे तुरुंगात ठेवण्यात आले आहे हे स्पष्ट आहे. आम्हा सर्वांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून ते लवकरच दोषमुक्त होतील हा विश्वास आहे”, असं ट्विट सु्प्रिया सुळे यांनी केलं आहे. सुप्रिया सुळे यांचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
दरम्यान नवाब मलिक यांना जामीन मिळाल्याने त्यांचे बंधू कॅप्टन मलिक यांना अश्रू अनावर झाले. नवाब मलिक यांना किडनीचा आजार असल्याच म्हणत ते रडू लागले. तर दुसऱ्या बाजूला नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक हीने ट्विट केलंय. “वेलकम बॅक लीडर”, असं कॅप्शन देत निलोफर मलिकने नवाब मलिक यांचा फोटो ट्विट केलाय.